विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनामुळे संपूर्ण जगाला प्रथमच अशा प्रकारच्या भयानक परिस्थितींचा सामना करावा लागला आहे. म्हणूनच, आरोग्य सेवेसह वेळोवेळी आरोग्याची काळजी न घेतल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. विशेषतः कोरोना महामारीचा मुलांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे, असा इशारा
युनिसेफने दिला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाची एका शाखा (विभाग किंवा घटक) असलेल्या युनिसेफच्या म्हणण्यानुसार, जगभरातील अनेक देशात रुग्णालयांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत, कुटूंब उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत, लाखो मुलांचे एक पालक किंवा दोघेही पालक गमावले आहेत. अनाथ मुलांसमोर अचानक परिस्थितीशी सामना करताना संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण आशियाई देशांची लोकसंख्या सुमारे दोन अब्ज आहे आणि जगातील एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या येथे राहते. दक्षिण आशियातील युनिसेफचे प्रादेशिक संचालक जॉर्ज लारेया आडजेई म्हणाले की, दक्षिण आशियाई देशांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध असण्यापेक्षा संसर्ग होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतानमधील कोरोना संसर्गाची स्थिती आणखी बिघडू शकते. जगातील देशांना दक्षिण आशियाई देशांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जॉर्ज लरेया पुढे म्हणाले की, युनिसेफ ही संस्था बाधित देशांना जीवनरक्षक औषधे आणि उपकरणे पुरवण्याचे काम करीत आहे. तसेच काही देशांमध्ये, लसचा एक डोसही न घेतल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सक्षम देशांना लसीचे अतिरिक्त डोस देऊन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय महिला आणि विकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, यंदा 1 एप्रिल ते 25 मे या कालावधीत 571 मुलांनी आपले पालक गमावले. या आपत्तीत त्यांचे दोन्ही पालक गमावलेल्या या मुलांसाठी केंद्र सरकार सर्व प्रकारे काळजी घेण्यास व संरक्षण करण्यास सक्षम आहे. या सर्व मुलांची सातत्याने काळजी घेतली जात आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे रक्षण केले जात आहे. या मुलांसाठी कोणत्याही निधीची कमतरता असणार नाही, याशिवाय या मुलांबाबत केंद्र व राज्य आणि संबंधित जिल्ह्यांच्या संपर्कात आहे. या मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाने युनिसेफच्या अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित संस्थाची नुकतीच बैठक घेतली आहे.