नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या वतीने कुपोषण निर्मूलनासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची युनिसेफ पथकाच्या वतीने पाहणी करण्यात आली. यावेळी सदर पथकाने एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प त्र्यंबकेश्वर अंतर्गत सामुंडी विभागातील कोजुली अंगणवाडी केंद्रास युनिसेफ पथकाने भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यानंतर सामुंडी येथे आरंभ अंतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या पालक मेळाव्यात युनिसेफ पथकाने पालकांशी संवाद साधला.
सामुंडी येथे भेट दिल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कुपोषण निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या किलबिल मेळाव्यांबाबत चर्चा करण्यात आली, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय सर्व विभाग व त्यांच्या योजना यांच्या समन्वयातून आकांक्षित तालुका सुरगाणा या ठिकाणी किलबिल मेळाव्याबाबत माहिती देत यामध्ये कुपोषित बालकांच्या पालकांना पशुसंवर्धन विभाग मार्फत कोंबडी वाटप करण्यात आल्याचे सांगितले प्रत्येक तालुक्यात किलबिल मेळावे आयोजित करण्यात आल्याचे सांगत त्यातून कुपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या RBSK APP चे सादरीकरण करण्यात आले. कुपोषण निर्मूलनासाठी राबवण्यात आलेल्या या या उपक्रमांबाबत युनिसेफच्या राजलक्ष्मी नायर यांनी कौतुक केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, राजलक्ष्मी नायर, मेरी क्लाऊड, संजय सिंग, समीर पवार, संजय प्रभू, नितीन वसईकर, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील आदि उपस्थित होते.