चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतासाठी आणि विशेषतः ग्रामीण भागासाठी अभिमानाची गोष्ट ठरलेली घटना म्हणजे, चांदवड येथील एसएनजेबीच्या स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी थेट संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८०व्या सत्रात (UNGA80) आयोजित विज्ञान शिखर परिषदेत सहभाग नोंदवून देशाचे प्रतिनिधित्व केले. या ऐतिहासिक क्षणाने ग्रामीण भारताच्या क्षमतांना आंतरराष्ट्रीय मंचावर अधोरेखित केले.
१० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत एसएनजेबी कॅम्पसहून थेट प्रक्षेपणाद्वारे झालेल्या या परिषदेत जगभरातील आघाडीचे शास्त्रज्ञ, राजनयिक व शाश्वतता नेते सहभागी झाले होते. यामध्ये महाविद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांनी विज्ञान राजनयिक व वक्ते म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, सामुदायिक सहभाग आणि शाश्वत विकास या विषयांवरील त्यांच्या स्थानिक प्रकल्पांनी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांना (SDGs) ठोस दिशा दर्शवली.
या उपक्रमाचा प्रस्ताव मे २०२५ मध्ये प्रा. यशराज पाटील यांचा स्पर्धात्मक जागतिक गटातून निवडला गेला होता. प्रा. दीपक संचेती यांनी या परिषदेचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात नासा, युरोप आणि इतर देशांतील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला अधिक व्यापकतेकडे घेऊन गेला.
संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. के. एम. संघवी, उपसंचालक डॉ. एम. आर. संघवी, प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड व महाविद्यालयाचे माननीय व्यवस्थापन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.
या भव्य कामगिरीनंतर विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा सत्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. या गौरवामुळे ग्रामीण भागातील युवकही जागतिक मंचावर संशोधन, विज्ञान, ग्लोबल डिप्लोमेसी आणि शाश्वत विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे. यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितेचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे मुख्य समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा,उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, विश्वस्त समिती सदस्य तसेच प्रबंध समितीचे मानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, विश्वस्त समिती सदस्य व महाविद्यालयाचे समन्वयक सुनीलकुमार चोपडा, प्रबंध समिती सदस्य व महाविद्यालय समन्वयक योगेश मोदी, अभिजित मोदी आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य तसेच संचालक आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.