अहमदाबाद (गुजरात) – आपल्या देशात बेरोजगारी हा असा मुद्दा आहे, ज्याबद्दल प्रत्येक सरकार वेगवेगळे दावे करत असते. परंतु या दाव्यांची वस्तुस्थिती नेहमीच वेगळी असते. गुजरातमध्ये जेव्हा ६०० पदांसाठी हजारो उमेदवार परीक्षा देण्यासाठी पोचले, तेव्हा या आश्वासनांची पोलखोल झालेली पाहायला मिळाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. बेरोजगारीचे हे जळजळीत वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे.
परीक्षार्थींवर लाठीमार करण्याचा गुजरातमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. हजारोंच्या संख्येने आलेले परीक्षार्थी घटनास्थळी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. परीक्षार्थींना एका रांगेत उभे करण्यासाठी तेथे तैनात असलेल्या पोलिसांचे घामटे निघाले. ही गर्दी बेकाबू झालेली दिसत आहे. या गर्दीमध्ये कोणीही कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नव्हते. मास्क घालण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे सर्रास उल्लंघन होताना पाहायला मिळाले.
पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या ग्रामरक्षक दल भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पालनपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येत परीक्षार्थी आले होते. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने केलेल्या सर्व व्यवस्था या गर्दीसमोर टिकू शकल्या नाही हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिस लाठीमार करताना दिसत आहे. यादरम्यान काही परीक्षार्थींना दुखापत झाली. या लाठीमाराविरोधात सर्व स्तरातून पोलिसांवर टीका करण्यात येत आहे.
https://twitter.com/ANI/status/1464630536589111298?s=20