नवी दिल्ली – जगातील सर्वांत वेगाने प्रगती करणाऱ्या भारतात पदवीधर बेरोजगारांची संख्या तेवढ्याच वेगाने वाढत आहे. ऐकायला नवल वाटत असले तरीही पदवी घेऊनही नोकरी नसलेला युवक या देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अलिकडेच सांख्यिकी मंत्रालयाने सादर केलेल्या एका अहवालात ही बाब उघडकीस आली आहे. पदवीधारकांना कुणीही नोकरीसाठी विचारत नसून पदव्युत्तर पदवी घेण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र, ऐवढे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही आणि मिळालीच तर पगार अत्यल्प असल्याचे जळजळीत वास्तव आहे.
मंत्रालयाने जुलै २०१९ ते जून २०२० या कालावधीसाठी हे सर्वेक्षण केले. त्यात देशातील सर्वच राज्यांमध्ये बेरोजगारीचा दर ४.८ टक्के आढळला आहे. तर यात पदवीधरांचे प्रमाण १७.२ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर १४.२ पदविकाप्राप्त (डिप्लोमा) आणि पोस्ट ग्रॅज्युएट किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेणाऱ्या बेरोजगारांचे प्रमाण १२.९ टक्के आहे.
सर्वच राज्यांमध्ये माध्यमिक किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेणारे बेरोजगार १०.१ टक्के असून उच्च माध्यमिक शिक्षण घेणारे बेरोजगार ७.९ टक्के आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करणाऱ्यांचे हाल देशात सर्वाधिक वाईट आहेत. बिरामध्ये ८५ टक्के पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणारे बेरोजगार नोकरीच्या शोधात फिरत आहेत.
विद्यार्थी पहिले कसेही करून पदवी प्राप्त करण्याच्या मागे लागतात आणि पदवी घेतल्यानंतर त्या दिशेने नोकरी शोधतात. मग नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगारांची संख्या वाढत जाते. बरेचदा इंजिनियरींगचे शिक्षण घेऊन नोकरी करतात आणि मग मन लागत नाही म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करतात. त्यात सिलेक्शन झाले तर ठीक आहे नाहीतर दुसरे काही तरी शोधायला सुरुवात करतात. अश्याने बेरोजगारांची संख्या वाढत जाते, असा अनुभव कामगार मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने मांडला आहे. मार्च २०२० ते जून २०२० या कालावधीत बेरोजगारांची संख्या अचानक वाढलेली दिसत आहे कारण त्यावेळी कोरोनाचा प्रभाव भारतात दिसायला लागला होता.
डिप्लोमाधारकांचे हाल अत्यंत वाईट
ज्या तरुणांनी कुठलाही डिप्लोमा केला आहे त्यांचे हाल अत्यंत वाईट आहे. पदवीधरांनाच कुणी विचारत नसल्याने डिप्लोमाधारक तर कुणाच्याही खिजगणतीत नाहीत. त्यामुळे डिप्लोमाधारक पुन्हा पदवीसाठी अर्ज करुन शिक्षण घेत आहेत. त्यानंतरही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
आव्हानांचा फेरा
शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांना अनुभव नसल्याने त्यांना नोकरी देण्यास अनेक कंपन्या इच्छुक नाहीत. अनुभवी असलेल्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. जर संधीच मिळाली नाही तर अनुभव कसा येणार आणि अनुभव नसेल तर नोकरी कशी मिळणार अशा फेऱ्यात युवक अडकले आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकार असो की केंद्र सरकार या गंभीर समस्येकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शिक्षण घेऊनही युवक निराशेच्या गर्तेत अडकत आहेत.
पदवीधर बेरोजगारांचे राज्य
दिल्ली १३.५ टक्के
बिहार १९.९ टक्के
हरियाणा १३.४ टक्के
झारखंड १४ टक्के
उत्तर प्रदेश १५.६ टक्के
उत्तराखंड २१.९ टक्के