नवी दिल्ली – दिवगंत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चिराग आणि काका पशुपती कुमार पारस या दोघांनी लोकजन शक्ती पार्टीचा (एलजेपी) ताबा कोणाकडे असेल याचे वेगवेगळे दावे केले होते. त्यांच्यात सुरू असलेला वाद निवडणूक आयोगात पोहोचला. आता निवडणूक आयोगाने वादावर तोडगा काढला असून, दोन्ही नेत्यांना नवीन पक्ष आणि चिन्हांचे वाटप केले आहे.
निवडणूक आयोगाने दोघांनाही याबाबत माहिती दिली आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाचे बंगला हे चिन्ह गोठवले असून, चिराग पासवान यांना हेलिकॉप्टर आणि पशुपती कुमार पारस यांच्या पक्षाला शिलाई मशीन चिन्ह दिले आहे. चिराग पासवान यांच्या पक्षाचे नाव लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) असे देण्यात आले आहे. तर पशुपती कुमार पारस यांच्या पक्षाला राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी असे नाव देण्यात आले आहे.
बिहारमध्ये दोन विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. मुंगेरच्या तारापूर येथे आणि दरभंगाच्या कुशेश्वरस्थानमध्ये ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. एलजेपीचे जुने चिन्ह गोठवून पक्षाचे चिन्ह वापरू नये असे निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना सांगितले होते. यावर लवकरच तोडगा काढावा अशा सूचनाही केल्या होत्या. परंचु निवडणूक आयोगानेच यावर तोडगा काढून वाद संपुष्टात आणला आहे.