इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन या जगप्रसिद्ध अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेच्या ९८व्या वर्षात नाशिकमधील चार धावपटूंनी सहभाग घेत भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला. ९० किमी अंतर, ११५० मीटर चढ-उतार, तापमान ५°C ते २२°C आणि एकूण २२,००० सहभागी अशा या अत्यंत आव्हानात्मक शर्यतीत नाशिकचे सीए निलेश झंवर, नीता नरंग, डॉ. विजय नेमाडे आणि महेश साळवे यांनी धाव घेतली.
“Ultimate Human Race” मध्ये नाशिककरांची जिद्द कॉम्रेड्स मॅरेथॉन ही पिएटर्मारिट्झबर्गहून सुरू होऊन डरबनमध्ये समाप्त होते. यंदा ‘डाउन रन’ स्वरूपात झालेल्या शर्यतीत पोल्ली हिल, इंचांगा, बोथा, फील्ड हिल आणि कौवी हिल यांसारख्या चढ-उतारांनी धावपटूंना कमालीचा ताण दिला. विशेषतः क्वाड्स, हॅम्स्ट्रिंग आणि गुडघ्यांवरील ताणामुळे या शर्यतीला ‘मानवी सहनशक्तीची कसोटी’ मानले जाते.
नाशिकच्या धावपटूंची कामगिरी :
सीए निलेश झंवर – ८ तास ४५ मिनिटे
• नाशिकमधून आतापर्यंतचा सर्वात वेगवान ‘कॉम्रेड्स रनर’
• बिल रोवन पदक प्राप्त
नीता नरंग (उपाध्यक्ष, एचडीएफसी बँक) – १० तास ५२ मिनिटे
• नाशिकमधील सर्वात वेगवान महिला धावपटू
• ब्रॉन्झ पदक प्राप्त
• नाशिकमधून ‘कॉम्रेड्स’ पूर्ण करणारी फक्त दुसरी महिला
• मागील वर्षी गंभीर शस्त्रक्रिया करूनही उल्लेखनीय पुनरागमन
डॉ. विजय नेमाडे – १० तास २४ मिनिटे
• ब्रॉन्झ पदक प्राप्त
महेश साळवे (उद्योजक) – उशिरा पूर्णता
• निर्धारित वेळेत धाव पूर्ण करता आली नाही, परंतु प्रचंड जिद्दीने फिनिशिंग लाईन पार केली.
ही स्पर्धा केवळ फिटनेस नव्हे तर मनोबल, चिकाटी आणि शिस्त यांची परीक्षा असते. नाशिकच्या या चार धावपटूंनी जागतिक स्तरावर आपल्या शहराची ओळख अधोरेखित केली आहे.