इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेना महायुतीला पाठिंबा दिला. एका समारंभात खा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ओमी कलानी यांनी हा पाठींबा जाहीर केला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी रात्री या युतीची घोषणा करण्यात आली.
गेले अनेक वर्षे तुरुंगात असलेले सुरेश उर्फ पप्पू कलानी सध्या तुरुंगाबाहेर असल्याने येथील राजकारण पुन्हा सक्रिय झाले आहेत. महापालिका आणि विधानसभेत सत्तेपासून दूर ठेवण्याच्या राजकारणात भाजप आणि कलानी यांच्यातील वैर वाढले असतांना ही युती झाली. लोकसभा निवडणुकीत खा. डॅा. श्रीकांत शिंदे यांना कलानी यांनी मदत केली होती. त्यानंतर शिवसेना व कलानी यांची जवळीक वाढली. काही दिवसांपूर्वी भाजपने कलानींचे काही निष्ठावंत गळाला लावत त्यांचा पक्षप्रवेश करुन कलानींला धक्का दिला होता. आज कलानी यांनी शिवसेनेबरोबर युती करुन भाजपला धक्का दिला.
या युतीनंतर खा. शिंदे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी महायुती सदैव कटिबद्ध आणि भक्कम आहे. शिवसेना पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी आज उल्हासनगरात भेट दिली. त्यावेळी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेना महायुतीला पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी जाहीर केले. त्यामुळे उल्हासनगरात शिवसेना महायुती आणखी भक्कम झाली आहे. यावेळी टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. तर आगामी महापालिका निवडणुका महायुती एकत्रित निवडणुका लढवणार असून उल्हासनगर महापालिकेवर महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.