इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राशिय आणि युक्रेनमध्ये गेल्या २ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात रशियन सैनिक हे युक्रेनियन महिलांवर अनन्वित अत्याचार करीत असल्याचे समोर येत आहे. एका अहवालातून तर महिलांवरील बलात्कार आणि शोषणाचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. तसेच, जगभरात त्याचा निषेधही व्यक्त केला जात आहे.
युक्रेनमध्ये सर्वत्र सामूहिक स्मशानभूमी सापडल्याचा दावा केला जात आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याने त्यांना तेथे दफन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. प्रथम बुचा शहरात एक सामूहिक स्मशानभूमी सापडली. आणि आता अशीच आणखी एक सामूहिक स्मशानभूमी राजधानी कीवपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर सापडली आहे. अमानुषपणाचा कळस म्हणजे युक्रेनियन महिलांवर अनन्वित अत्याचार केल्यानंतर त्यांना ठार मारले जात आहे. त्यानंतर त्यांना थडग्यात पुरण्यात येत आहे.
कबरीतून मृतदेह काढून शवविच्छेदन केले जात असताना हृदयद्रावक वास्तव समोर येत आहे. ज्या महिलांचे मृतदेह कबरीतून बाहेर काढले जात आहेत, त्यांच्यावर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि नंतर त्यांना पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या घालण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. युक्रेनियन फॉरेन्सिक डॉक्टर ब्लाडिस्लाव्ह पेरोव्स्की आणि त्यांची टीम कीव जवळ एका सामूहिक कबरीत सापडलेल्या मृतदेहांवर पोस्टमॉर्टेम करत आहेत. डॉ. ब्लाडिस्लेव्ह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना फॉरेन्सिक तपासणीत असे आढळून आले की, ज्या युक्रेनियन महिलांना ठार करून थडग्यात पुरण्यात आले होते, त्यांच्यावर यापूर्वी बलात्कार झाला आहे.
डॉ. ब्लाडिस्लेव्ह म्हणाले की, यासंदर्भात ते यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाहीत. कारण त्यांना आणि त्यांच्या टीमला अनेक मृतदेहांची तपासणी केल्यानंतर अद्याप डेटा तयार करायचा आहे. डॉ. ब्लाडिस्लाव आणि त्यांची टीम बुचा, इरपिन आणि बोरोडियान्का या शहरांमधून सापडलेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करत आहेत. या ठिकाणी रशियन सैनिकांनी नरसंहार केल्याचा आरोप आहे.
अधिकृतरित्या मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर ब्लादिस्लाव आणि त्यांची टीम दररोज 15 मृतदेहांची तपासणी करतात. यातील अनेक मृतदेह कुजले असून त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. डॉ. अबलाडिस्लेव्ह यांनी सांगितले की, अनेक मृतदेह असे आहेत, ज्यांची ओळख पटवणे अशक्य आहे. अनेकांचे चेहरे खराब झाले असून त्यांच्या मृतदेहाचे अवशेष जोडावे लागतील. कधी कधी असा मृतदेहही सापडतो ज्याला डोके नसते, असेही ते म्हणाले.