मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये अजूनही युद्ध सुरु आहे. यादरम्यान युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी गेले आहेत. यातील काही विद्यार्थी परत आले असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यात युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता यांच्यासह युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सध्या राज्यामध्ये २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (३ हजार ६५० जागा), महानगरपालिकेची ५ वैद्यकीय महाविद्यालये (९०० जागा), शासन अनुदानित १ वैद्यकीय महाविद्यालय (१०० जागा), खाजगी विनाअनुदानित १९ वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार ७७० जागा) आणि १२ अभिमत वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार २०० जागा) यामध्ये एकूण ९ हजार ६२० इतक्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध आहेत. या सर्व महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. चे प्रवेश अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट-युजी प्रवेश परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार करण्यात येतात. नीट-यूजीच्या गुणवत्तेच्या अभावी अथवा अन्य कारणास्तव राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी युक्रेनसह रशिया, फिलिपाईन्स किंवा इतर देशात वैद्यकीय प्रवेश घेत असतात.
सध्या अजूनही रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु असून ही युद्धाची परिस्थिती किती दिवस राहील हे सांगता येणार नाही. शिवाय युद्धासारखी परिस्थिती आल्यामुळे आता भारतासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे बहुतांश पालक आपल्या मुलांना पुन्हा तेथे पाठविण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेता येण्यासाठी केंद्र शासनाचे परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य विभाग याबरोबरच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत या तिन्ही ठिकाणी पाठपुरावा करुन या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी परवानगी मागण्यात येईल, असे मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.
भारतामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहित केलेला वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम तसेच युक्रेन या देशातील विद्यापीठांमार्फत शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम यामध्ये समानता नाही. वैद्यकीय शिक्षण पाठ्यक्रम, शैक्षणिक कालावधी, सत्र निहाय विषय व प्रात्यक्षिक यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे युक्रेन येथून एमबीबीएस अभ्यासक्रम शिक्षणाकरिता गेलेल्या व राज्यात परत येत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांबाबत केंद्र शासनामार्फत ठरविण्यात येणाऱ्या धोरणानुसार योग्य तो निर्णय घेणे योग्य राहील. 15 मे 2022 पर्यंत युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या 532 विद्यार्थ्यांची माहिती, वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत संकलित करण्यात आली आहे. तसेच युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांची निवेदने, अडचणी जाणून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले हे नोडल अधिकारी असतील, असेही मंत्री श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ नेते खासदार श्री.पवार म्हणाले, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम करता येईल. तसेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांचे ग्रंथालयही वापरता येईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांना दूरस्थ शिक्षण (Foster Education) सुविधा देण्याची तयारी वैद्यकीय शिक्षण विभागाने ठेवली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी दूरस्थ शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, अशा सूचना यावेळी श्री. पवार यांनी दिल्या.