बागेश्री पारनेरकर आणि सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. कुठेही जाताना आधार कार्ड लागतेच. पण आधार कार्ड विषयी बऱ्याचदा अनेक समस्या असतात. नवीन आधार कार्ड काढणे, आधारवरील मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, फोटो आयडी, बायोमेट्रिक यात काही बदल करायचा असेल तर नेमका कुठे करायचा, किती वेळ लागतो ही चिंता आता नाशिकरांची मिटली आहे. द्वारका येथे जानकी प्लाझा आधार सेवा केंद्र सुरू झाले आहे. हे कराड भेळ भांडार शेजारी आहे. या ऑफिसमध्ये पासपोर्ट ऑफिसप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने सेवा मिळते. आधार संबंधित कोणतीही समस्या आता एका छताखाली सोडवली जाऊ शकते.
या केंद्राचे मॅनेजर ऋषिकेश बोराडे यांनी या केंद्राविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, नाशिकमध्ये आधार संबंधी हे पहिलेच मोठे सेवा केंद्र आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत हे सेवा केंद्र आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट न घेता कोणी आलं तरी त्यांना या केंद्रावर मदत केली जाईल, कोणतेही अतिरिक्त फी न आकारता सरकारी फी प्रमाणे आधार अपडेट करण्यात येते. एका दिवसात पाचशे पेक्षा जास्त लोकांचे काम या ठिकाणी होऊ शकते. नाशिकरांनी या आधार सेवा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. हे कार्यालय आठवड्यातील सातही दिवस सुरु राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आपल्याला कामे करता येणार आहे.