नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोस्टमास्तर जनरल नवी मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात डाक कार्यालयांकडून आयोजित शिबीरांद्वारे नागरिकांची आधार कार्ड नोंदणी व आधार अद्ययावत करणे या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने गृहनिर्माण संस्था, आपार्टमेंट असोसिएशन, स्वयंसेवी संस्था , औद्योगिक प्रतिष्ठान व इतर कोणत्याही व्यक्ती व संस्थांनी मागणी केल्यानुसार आधार शिबीर सेवा पुरवली जाणार असल्याची माहिती नाशिकचे प्रवर डाक अधिक्षक यांनी दिली आहे.
आधार शिबीरांची मागणी करतांना आधार नोंदणी व आधार अद्ययावत करणे यांचे किमान 100 व्यवहार होतील अशी खात्री देणे आवश्यक आहे. अशी शिबीरे कोणत्याही सोसायटीत, संस्था, कंपनी असोसिएशन येथे आयोजित करता येतील. या शिबीरात आवर्ती ठेव (RD), सुकन्या समृद्धी खाती (SSA), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे (MSSC) इत्यादींचे नवीन खाती उघडण्यासाठीचे फॉर्मही स्वीकारले जाणार आहेत.
शिबीराचे आयोजन करू इच्छीणाऱ्या व्यक्तींनी शिबीराचे आयोजन प्रस्तावित असलेल्या ठिकाणाच्या संपूर्ण तपशिल सह सहाय्यक संचालक पोस्टल सेवा, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, नवी मुंबई क्षेत्र, २ रा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत, सेक्टर १९, पनवेल-410206 या पत्त्यावर अथवा bdnmr.mh@indiapost.gov,in या ईमेलवर मागणीची माहिती कळवावी. अधिक माहितीसाठी 022-27482724 या क्रमांकावर व्हॉटसॲप कॉल अथवा मेसेजद्वारे संपर्क साधावा, असेही प्रवर डाक अधिक्षक यांनी कळविले आहे.