नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने आधार कार्डबाबत एक महत्त्वपूर्ण सूचना प्रसिद्ध केली आहे. गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नागरिकांना त्यांच्या आधार कार्डच्या केवळ मास्कड प्रतीच कुणाशीही शेअर करण्यास सांगितले आहे. एका प्रसिद्धीपत्रकात सरकारने म्हटले आहे की, “तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला बिनदिक्कतपणे शेअर करू नका. कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो.” तसेच सरकारने केवळ मुखवटा घातलेला (मास्कड) आधार शेअर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर फक्त शेवटचे चार अंक नोंदवलेले असतात.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, परवाना नसलेल्या खाजगी संस्थांना हॉटेल आणि सिनेमा हॉलप्रमाणे आधार कार्डच्या प्रती गोळा करण्याची किंवा ठेवण्याची परवानगी नाही. “फक्त ज्या संस्थांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून वापरकर्ता परवाना प्राप्त केला आहे तेच एखाद्या व्यक्तीची ओळख स्थापित करण्यासाठी आधार वापरू शकतात,” असे सरकारने म्हटले आहे.
सरकारने नागरिकांना त्यांचे आधार कार्ड शेअर करण्यापूर्वी संस्थेकडे UIDAI कडून वैध वापरकर्ता परवाना असल्याची पडताळणी करण्यास सांगितले आहे. याव्यतिरिक्त, सरकारने नागरिकांना त्यांचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफेमध्ये सार्वजनिक संगणक वापरू नये असा इशारा दिला आहे. “तुम्ही असे केल्यास, कृपया खात्री करा की तुम्ही त्या संगणकावरून ई-आधारच्या सर्व डाउनलोड केलेल्या प्रती कायमस्वरूपी हटवल्या आहेत,” असे सरकारने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.