नवी दिल्ली – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणतर्फे (यूआयडीएआय) लवकरच रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी आधार नोंदणीची सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी यूआयडीएआयकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. नवजात बालकांना आधार क्रमांक देण्यासाठी जन्म नोंदणी विभागासोबत करार करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ गर्ग यांनी दिली.
९९ टक्के वयस्क
गर्ग म्हणाले, की देशातील ९९.७ टक्के वयस्क नागरिकांची आधारमध्ये नोंदणी झाली आहे. आम्ही १३१ कोटी नागरिकांची नोंदणी केली आहे. आता नवजात बालकांची नोंदणी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी दोन ते अडीच कोटी बाळांचा जन्म होतो. त्यांची आधारमध्ये नोंदणी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
१२० कोटी बँक खाते लिंक
यूआयडीएआयच्या सीईओंनी सांगितले, की जन्मानंतर नवजात बालकांचे सामान्य छायाचित्र घेऊन आधारकार्ड देण्यात येणार आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमॅट्रिक आम्ही घेऊ शकत नाही. परंतु त्याला त्याच्या पालकांच्या आधारशी लिंक केले जाईल. पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर बाळाचे बायोमेट्रिक घेतले जाईल. १४० कोटी बँक खात्यांपैकी १२० कोटी खाते आधारशी लिंक करण्यात आले आहेत.
सर्व नागरिकांना आधार
गर्ग म्हणाले, आम्ही देशातील पूर्ण लोकसंख्येला आधार क्रमांक देण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्यावर्षी आम्ही दुर्गम भागात दहा हजार शिबिरांचे आयोजन केले होते. त्या शिबिरांमध्ये अनेक नागरिकांकडे आधार क्रमांक नसल्याचे आम्हाला समजले. ३० लाख नागरिकांची नोंदणी करण्यात आली.
दरवर्षी १० कोटी नागरिकांकडून अपडेट
ते म्हणाले, की आम्ही २०१० रोजी पहिला आधार क्रमांक दिला होता. सुरुवातीला जास्तीत जास्त नागरिकांना आधार क्रमांक देण्यासाठी नोंदणी करण्यावर आमचा भर होता. ती माहिती अपडेट करण्याकडे आता आमचे लक्ष आहे. दरवर्षी जवळपास १० कोटी नागरिक आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेट करून घेतात.
आधारमुळे सरकारची बचत
एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार अनेक बनावट आधार कार्ड बाळगणार्या लाभार्थ्यांना यूआयडीएआयने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यावर गर्ग म्हणाले, की आधारमुळे केंद्र सरकारची २.२५ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. केंद्र सरकारच्या ३०० आणि राज्य सरकारांच्या ४०० योजनांना आतापर्यंत आधार लिंक करण्यात आले आहे. त्याचा फायदा असा झाला की, या योजनांमधील बनावट लाभार्थ्यांना त्वरित पकडले जात आहेत.
माहिती गोळा करणार
गर्ग म्हणाले, की आगामी वर्षांमध्ये यूआयडीएआयकडून तीन-चार गोष्टींना प्राधान्य दिले जाणार आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा आणि सुविधा मिळाव्यात. त्याअंतर्गत आम्ही नागरिकांना घरी बसल्या बसल्या आपली माहिती अपडेट करण्याची सुविधा पुरविली आहे. आता दीड लाखांहून अधिक पोस्टमन देशभरातील गावा-गावात जाऊन आधार अपडेट करण्यासह नवे आधारकार्ड बनवण्यासाठी माहिती गोळा करणार आहेत. आम्ही देशातील ६.५ लाख गावांसाठी ५० हजारांहून अधिक आधार केंद्र उघडणार आहोत.