पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विशिष्ट्य विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केल्यानंतर अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. कारण मुक्त व दूरस्थ (ओपन युनिव्हर्सिटी व डिस्टन्ट एज्युकेशन) शिक्षणासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या मार्गदर्शक तत्वांमधून सावधानतेचा इशाराच देण्यात आला आहे.
विशेषतः नोकरीमुळे वा काही कौटुंबिक अडचणींमुळे अनेकांना प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन शिक्षण घेणे अवघड जाते. अशात मुक्त विद्यापीठे व अभिमत विद्यापीठे विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देतात. त्यासाठी विविध अभ्यासक्रमांचे पर्याय दिले जातात. मात्र यापुढे हा मार्ग खडतर असणार आहे, हे युजीसीच्या नव्या मार्गदर्शक तत्वांवरून स्पष्ट होते. युजीसीने अॉनलाईन किंवा मुक्त व दूरस्थ पद्धतीने शिकविण्यासाठी प्रतिबिंधित केलेल्या १७ शाखांची यादीच जारी केली आहे.
यामध्ये इंजिनियरिंग, मेडीकल, फिजिओथेरेपी, पॅरामेडिकल, फार्मसी, नर्सिंग, विधी, डेन्टल, आर्किटेक्चर, कृषी, हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग, एव्हिएशन, एअरक्राफ्ट मेन्टनन्स आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या शाखांना प्रवेश घेऊ नका, असा सावधानतेचा इशाराच युजीसीने दिला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कुठल्याही महाविद्यालयात वा विद्यापीठात विशिष्ट्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना काळजी घेण्याचे आवाहन युजीसीने केले आहे. संबंधित अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे का, याची खातरजमा करावी. तसेच या अभ्यासक्रमांचा कालावधी, आवश्यक पात्रता तपासून घ्यावी, असे युजीसीने विद्यार्थ्यांना म्हटले आहे.
परवानगी आहे का तपासून घ्या
दूरस्थ शिक्षणासाठी कुठल्याही महाविद्यालयात एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, त्या अभ्यासक्रमाची परवानगी महाविद्यालयाला किंवा विद्यापीठाला आहे का, हे तपासून बघण्याचा सल्ला युजीसीने दिला आहे. त्यासंदर्भातील सत्यता पडताळून बघण्यासाठी युजीसीच्या संकेतस्थळाचा आधार घेण्यासही सांगण्यात आले आहे. संबंधित संस्थेने मान्यतेची प्रत, प्रतिज्ञापत्र युजीसीकडे सादर केले आहे का, हेही पडताळून बघावे, असे युजीसीने म्हटले आहे.
UGC University Grant Commission Student Admission Open Universities
Distance Learning