नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)ने महाविद्यालयीन प्रवेशांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता महाविद्यालयीन प्रवेशात अमुलाग्र बदल होणार आहे. युजीसीने देशातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना यासंदर्भात पत्र लिहीले आहे. त्यात या आदेशाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय विद्यापीठांना शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सेट ( CET ) ची तयारी करण्यास सांगितले आहे. यासोबतच आयोगाने पीएचडी प्रवेशासाठी नेट ( NET ) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक केले आहे. पीएचडी, पीजी आणि यूजी प्रवेशासाठी यूजीसीने जारी केलेले नवीन नियम पुढील शैक्षणिक सत्र 2022-23 साठी लागू होतील.
सीईटी परीक्षा रद्द
केंद्रीय विद्यापीठांसाठी केंद्रीय पात्रता परीक्षा किंवा सीईटी राष्ट्रीय परीक्षेद्वारे 13 भाषांमध्ये घेतली जाईल. UGC ने खाजगी आणि इतर अभिमत विद्यापीठांना प्रवेशासाठी CET स्कोअर विचारात घेण्यास सुचवले आहे. या वर्षीपासून केंद्रीय विद्यापीठांच्या सीईटी परीक्षा सुरू होणार होत्या, परंतु कोरोना महामारीमुळे ती रद्द करण्यात आली.
सर्व कुलगुरूंना पत्र
विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्व केंद्रीय विद्यापीठांना शैक्षणिक सत्र 2022-23 पासून सामायिक प्रवेश परीक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या परीक्षा किमान 13 भाषांमध्ये घेतल्या जातील ज्या NTA आधीच JEE आणि NEET परीक्षा घेत आहे. स्वारस्य असलेली राज्ये, खाजगी विद्यापीठे, मानीत विद्यापीठे देखील सामाईक प्रवेश परीक्षा स्वीकारू शकतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार हे बदल प्रस्तावित आहेत.
परीक्षेचा प्रस्ताव :
एनईपीने सर्व विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी केंद्रीय परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांवरील अवलंबित्व कमी झाले. सीईटीने सर्व विद्यार्थ्यांना एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.