मोहाली (हरियाणा) – ऑनलाइन स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा करणाऱ्या मोठ्या टोळीतील नऊ संशयितांना जिंद पोलिसांनी अटक केली आहे. यूजीसी नेट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटीचे संपूर्ण प्रकरण हरियाणाच्या भिवानी येथील विकास अॅकॅडमीशी निगडित असल्याचे उघड झाले आहे. या अॅकॅडमीतच सर्व परीक्षार्थिंना एक दिवस आधी बोलावून प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात होत्या. पोलिस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यूजीसी नेटचा पेपर देण्यासाठी कला शाखेत पदव्युत्तर पदवीत ५५ टक्के गुण असणे अनिवार्य आहे. या ५५ टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून पुनित आणि रिंकू हे संशयित अॅकॅडमीत प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायचे. यामध्ये ते आणखी काही जणांची मदत घेत होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास भिवानीमध्येच केंद्रीत करण्यात आला आहे.
टोळीप्रमुखाचे नाव विकास असल्याचे समोर आले आहे. विकासबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विकासची भिवानीमध्ये एक अॅकॅडमी आहे. विकासचा मेहुणा पुनित या अॅकॅडमीचे काम पाहात होता. स्वतः पुनित आणि रिंकू १२ वी उत्तीर्ण आहेत. दोघेही प्रश्नपत्रिका फोडण्याचा गोरखधंदा करत होते.
अशी होती मोडस ऑपरेंडी
परीक्षेच्या आदल्या दिवशी विकास पुनितकडे प्रश्नपत्रिका पाठवत होता. सकाळी परीक्षा असल्यास परीक्षार्थिंना आदल्या दिवशी सायंकाळी बोलावून घेतले जात होते. जर पेपर सायंकाळी असल्यास परीक्षार्थिंना सकाळी बोलावून प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जात होती. विकास पुनित आणि रिंकूकडे प्रश्नपत्रिका पाठवत होता. नंतर पुनित, रिंकू आणि राहुल हे तिघे मिळून परीक्षार्थींना आपल्या जाळ्यात ओढत होते. पैशांची देवाणघेवाणही अशाच प्रकारे केली जात होती. राहुल ग्राहकांना आणत होता. परीक्षा दिल्यानंतर परीक्षार्थ्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेत होता. तीन लाखांपैकी तो स्वतःसाठी १५ ते २० हजार रुपये कमिशन ठेवून घेत होता. बाकी पैसे रिंकू आणि पुनितला देत होता. हे पैसे विकासकडे जात होते.
अटक करण्यात आलेल्या नऊपैकी महेंद्रगढच्या पत्थरवाल येथील रहिवासी रिंकू, भिवानी जिल्ह्यातील बामला येथील रहिवासी पुनित आणि खटकड येथील रहिवासी राहुल यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. इतर संशयितांपैकी अर्जुन, अभिषेक, विक्रम, दीपक, मनजीत, अमरजित यांना एक दिवसाची कोठडी मिळाली आहे. सध्या कोणत्याही परीक्षार्थ्याला अटक झालेली नाही.