अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अभियांत्रिकी, वैद्यकीय, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, फार्मसी अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांना चांगला माणूस बनवण्यासाठी कौशल्यांवर आधारित शिक्षण देण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव प्रा. रजनीश जैन यांनी सर्व राज्ये व विद्यापिठांना यासंदर्भात पत्र लिहिली आहेत.
उच्च शिक्षण संस्थांमधील नवीन शिक्षण धोरणांतर्गत, आगामी सत्र २०२२ मिड-ग्रॅज्युएट प्रोग्रामअंतर्गत जीवन कौशल (लाइफ स्किल) २.० म्हणजे आवश्यक गोष्टी जोडल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांची संवाद कौशल्ये, व्यावसायिक, नेतृत्व आणि मार्गदर्शन, सार्वत्रिक मानवी मूल्य कौशल्यांचा यात समावेश असेल. तरुणांना नोकरीसाठी सामाजिक, जबाबदार, धार्मिक, अहिंसक, चांगला माणूस, व्यावसायिक आणि व्यावहारिक बनवण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. या एकूण १२० तासांच्या अभ्यासात आठ क्रेडिट तयार करण्यात आले आहेत. पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच व्यावसायिक विषयांद्वारेच कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.
आयोगाचे सचिव प्रा. जैन यांनी पत्रात शैक्षणिक धोरण २०२०मध्ये विद्यार्थ्यांना संवाद कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये, नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्ये आणि उपयुक्त मानवी मूल्ये आणि कौशल्ये शिकवण्यात येतील. त्यासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन संकल्पना मसुदा अभ्यासक्रम तयार करण्यात आला अहे.
२०१७ साली अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यांची कमतरता असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये, सामाजिक चिंता, संवाद कौशल्याचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे या कंपन्यांकडून समोर आले, त्यामुळे कौशल्य विकासावर आधारित शिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे प्रा. जैन यांनी सांगितले आहे.
संवादकौशल्य, श्रवणकौशल्य, लेखनकौशल्य, डिजिटल शिक्षण आणि सोशल मीडिया, सायबर सुरक्षा यांमध्ये आत्ताच्या काळात मोठे बदल झाले आहेत. रेझ्युमे, मुलाखत, ग्रुप डिस्कशन, विविध उदयोन्मुख भविष्याची तयारी, आत्मविश्वास, टीम वर्किंग, आदी ज्ञान यातून विद्यार्थ्यांना मिळेल. तसेच वैश्विक मानवी मूल्ये अहिंसा, शांती, सेवा, प्रेम, दया, सत्य, मानवी मूल्यही विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात येतील.