नवी दिल्ली – कोरोनामुळे केवळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे नव्हे तर विद्यापीठ स्तरावर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ही मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विविध केंद्रीय आणि इतर विद्यापीठांसाठी कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता अधिक लवचिक नियम केले आहेत. या अंतर्गत, कोरोनाच्या महामारीनंतरही ऑनलाईन ( दूरस्थ ) शिक्षणाद्वारे नियमित विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थाना महत्त्वाचे अभ्यासक्रम चालवण्याची परवानगी दिली जाईल.
युजीसीने १२३ विविध ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ४० अभ्यासक्रम पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आणि ८३ पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी असतील. देशभरातील विद्यार्थी हे अभ्यासक्रम करू शकतील. यासाठी त्यांना ऑनलाइन व्यासपीठ ‘स्वयम’ किंवा ‘स्टडी वेबच्या अॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स’ द्वारे अर्ज करावा लागतो. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा संपूर्ण तपशील आणि पात्रता माहिती यूजीसीच्या वेबसाइटवरून मिळू शकते. यूजीसीचे अध्यक्ष डी.पी. सिंग म्हणाले की, डिजिटल प्लॅटफॉर्मवर अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. या संदर्भात त्यांनी ‘स्वयं’, ‘स्वयं प्रभा’, राष्ट्रीय शैक्षणिक भांडार आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला. यूजीसीच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे.
यूजीसीच्या मते, ‘स्वयम’ ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या परीक्षाही घेण्यात येतील. विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंना या परीक्षा आयोजित करण्याची प्रक्रिया ऑगस्टच्या अखेरीस सुरू होईल याची खात्री करावी लागेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर या परीक्षा आयोजित करेल, तसेच जानेवारी-एप्रिल २०२१ सेमेस्टरपासून विविध अ-तांत्रिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेईल. दरम्यान, यूजीसीने सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना स्वयमद्वारे परीक्षा आयोजित करण्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. स्वयम देशभरातील सर्व विद्यार्थी, कार्यरत व्यावसायिक, आजीवन विद्यार्थी आणि इतरांना नॉन-टेक्निकल मास्टर्स आणि पदवीपूर्व अभ्यासक्रम देते. याशिवाय, यूजीसी प्रादेशिक भाषांच्या वापरालाही प्रोत्साहन देईल. विविध प्रादेशिक भाषांमधील तांत्रिक अभ्यासक्रमांना परवानगी देऊन, भाषिक अडथळा दूर करेल, या दिशेने त्याने अनेक पावलेही उचलली आहेत.