नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिन्नर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पंचायत समितीचे माजी गटनेते उद्य सांगळे यांनी आज मुंबईत प्रवेश घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
सिन्नर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात आता शरद पवार गटातर्फे उदय सांगळे रिंगणात उतरणार आहे. याअगोदर २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेतर्फे राजाभाऊ वाजे यांनी लढवली होती. पण, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत ते नाशिक लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी आपला दावाही सोडला. त्यामुळे ही जागा शरद पवार गटाकडे गेली असून येथून आता उदय सांगळे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
उद्य सांगळे यांच्या पत्नी शितल सांगळे या नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या काळात अनेक विकास काम झाली. त्यांची प्रशासनावरही पकड होती. त्यामुळे घराचा राजकीय वारसा समोर ठेऊन त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील देण्यात आला आहे.