इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उध्दव ठाकरे यांना दिलेल्या थेट जाहीर ऑफरची चर्चा सुरु असतांनाच आज उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत तब्बल २० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
उध्दव ठाकरे यांच्याबरोबर आदित्य ठाकरे सुध्दा होते. अँटी चेंबररमध्ये ही चर्चा झाली. विधानसभा विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती संदर्भात ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी हिंदीची सक्ती हवीच कशाला? हे पुस्तक उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेट दिले. हेच पुस्तक नव्याने नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावे असे देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना सांगितले.
काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप २०२९ पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचे सांगीतले. या वक्तव्यामुळे आता तर्कवितर्क लढवले जात होते. त्यात ही भेट झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
ठाकरे गटाने दिली ही माहिती
आज विधानभवन येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी राज्यभरातील विविध संपादकांनी हिंदीसक्तीविरोधात लिहिलेल्या लेखांचे संकलित ‘हिंदी हवी कशाला?’ पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभापती राम शिंदे ह्यांना भेट दिले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विधानसभा गटनेते भास्कर जाधव, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, आमदार सुनिल राऊत, आमदार जगन्नाथ अभ्यंकर, आमदार महेश सावंत, आमदार बाळा नर, आमदार संजय देरकर उपस्थित होते.