मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेमध्ये थेट उभी फूट पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आणि सेनेचे तब्बल दोन डझन आमदार सुरतमध्ये तळ ठोकल्याने शिवसेना व महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी बैठक बोलावली होती, मात्र त्यात केवळ 20 आमदारांनीच हजेरी लावली आहे. त्यामुळे उद्धव यांचे टेन्शन चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे एकूण ५५ आमदार आहेत. यातील तब्बल २७ आमदारांनी पक्ष सोडला तर त्यांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही. अशा परिस्थितीत ३५ आमदार उद्धव ठाकरेंच्या बैठकीपासून दूर राहिल्याने तसे मोठे संकेत मिळत आहेत. मात्र, शिवसेना आता डॅमेज कंट्रोल होण्यापासून बचावासाठी गुंतली आहे. एकीकडे त्यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरी यांच्याकडे ही कमान सोपवली आहे.
नजिकच्या काळात सत्तांतर दाखविण्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि आघाडी सरकारच्या चिंतेतही भर पडली आहे. दोन डझनापेक्षा अधिक आमदारांनी जर शिवसेना सोडली तर अनेक जिल्हाप्रमुख आणि अन्य नेतेही बाहेर पडण्याची चिन्हे आहेत. हा सर्व प्रकार कसा रोखायचा, या सर्व आमदार नेमके म्हणणे काय आहे, याबाबच तर्कवितर्क लढविले जात आहेत. सत्ताधारी प्रमुख पक्षाची अशी स्थिती होणे हे चांगले लक्षण नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
uddhav thakre shivsena meet mla presence damage control