इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर सरकारच्या या निर्णयाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट करत म्हटले की, ‘विजय मराठी माणसाचा विजय मराठी भाषेचा. मराठी माणूस एकवटताना दिसताच भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. ही तर फक्त सुरुवात आहे. एकीचं बळ महाराष्ट्र पाहणार आहे.
या ट्विट नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी म्हटले की, मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरली आहे. सक्ती हरली आहे. मराठी माणसाने ताकद दाखवली तर सरकार मागे हटतं. मराठी माणसात विभागणी करायची आणि मराठी अमराठी असं करून अमराठी मतं भाजपकडे खेचायची असा त्यातला भाजपचा छुपा अजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसाने समंजसपणाची भूमिका घेतली. भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध आहे. सक्तीच्या विरोधात आंदोलन असल्याने त्यात फूट पडली नाही. मराठी माणसाची फूट लाभदायक ठरेल असं सरकारला वाटलं होतं. आज आंदोलन केल्यावर मराठी माणूस एवढा एकवटेल असं वाटलं नव्हतं सरकारला. ५ तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून त्यांनी तो जीआर रद्द केला.
यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या बोलणं झालं का या प्रश्नावरही उत्तर दिले. आमचं बोलणं सुरु आहे. प्रत्यक्ष राजचं आणि माझं बोलण सुरु नसले तरी आमची माणसं बोलतात. म्हणूनच या लढ्यामध्ये जे जे कुणी सहभागी झाले. मराठी भाषा समिती, साहित्यिक, संस्था, मनसे, शिवसेना या सर्वांची ५ तारखेला एकत्रित सभा झालीच पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.