मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कलगीतुरा कायम आहे. दोघेही एकमेकांना दुषणे देतानाच नवनवीन पद्धतीने जोरदार हल्ला चढवित आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी टीका करताना म्हटले आहे की, जोडे पुसणारे राज्य करीत आहेत. त्यांचे हे वाक्य एकनाथ शिंदे यांच्या खुपच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे त्यांनी यावर ट्वीटरद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तरात म्हटले आहे की, काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, असे शिंदेंनी म्हटले आहे.
पुढे शिंदे म्हणतात की, जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
Uddhav Thackeray Politics Eknath Shinde Critic Answer