इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गेल्यानंतर ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा होती. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. यावेळी त्यांनी अतिशय घाणाघाती भाषण केले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे
आपला देश पुन्हा गुलामगिरीत जाणार नाही, यासाठी प्रतिज्ञा करा.आता आपण देशासाठी उभे राहिलो नाही, तर 2024 या देशातील शेवटच्या निवडणुका ठरतील.त्यानंतर अशी हुकूमशाही सुरू होईल की तुम्हाला डोकेही वर काढता येणार नाही!
बीजेपीचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? भारतमाता म्हणजे माझा देश…स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करुन देश स्वतंत्र केला आहे. गोमुत्र शिंपडुन देश स्वतंत्र झालेला नाही !
आपण मुख्यमंत्री असताना कर्नाटकची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत नव्हती ..आता कर्नाटक महाराष्ट्राविरोधी बोलत आहेत आणि ते शेपटी घालून बसले आहेत !
एक काळी टोपीवाला होता, गेला. त्याने शिवाजी महाराज यांचा अपमान केला, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तरीही यांच्या शेपट्या बाहेर येत नाहीत. दिल्लीसमोर शेपटी आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापी नव्हते !
गद्दारांना वाटत असेल ते शिवसेना चेरू शकतात, ते नाव त्यांनी चोरले आहे, पण शिवसेना त्यांना चोरता येणार नाही. धुनष्यबाण त्यांनी चोरला असेल पण तो त्यांना पेलवेल का? खरी शिवसेना कोणती हे बघायला त्यांनी यावे..
हिंमत असेल तर महाराष्ट्रात फक्त मोदींच्या नावाने मतं मागून दाखवा. बाळासाहेबांची जराही नाव घेऊ नका.
हा चुना लगाव आयोग आहे, सत्तेचे गुलाम आहेत. वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत ते. या निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलीय हे लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही.
ज्यांना शक्य ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय?
कोण होता हा भाजप? कोण होतं त्यांच्या मागे? बाळासाहेब त्यांच्या मागे राहिल्याने ते वाढले. ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, त्यांना असंच चिरडायचं असतं. ही ढेकणं चिरडायला एक बोट पुरेसं आहे. ज्यांना आपलं कुटुंब मानलं त्यांनीच आपल्या आईवर हल्ला केला. ज्यांचं राजकीय आयुष्य गेल्या १०-१५ वर्षात फुललं, ते आता आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवतात.
तुमचा अर्धा वेळ फिरण्यामध्ये जातोय, अर्धा वेळ दिल्लीला मुजरा करायला आणि अर्धा वेळ ज्यांना खोकी मिळाली नाहीत, मंत्रीपदं मिळाली नाहीत त्यांना सांभाळायला जातो.
Uddhav Thackeray Khed Speech Important Points