मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी पूर्ण होत असून, त्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात बुधवारी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोटो काढतांना एकाच फ्रेममध्ये दिसले. हे दोन्ही नेते एकमेकांसमोर पहिल्यांदा आले. पण, त्यांनी एकमेकांपासून अंतर ठेवले. फोटोसेशनच्यावेळी अनपेक्षितपणे उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची गोची झाल्याचे पाहायला मिळाले. उध्दव ठाकरे यांना बसण्याची खुर्ची ही शिंदेच्या बाजूची होती. पण, त्यांनी ते टाळले व निलम गो-हेच्या ते बाजूला बसले. यावेळी सगळ्या नेत्यांनी उध्दव ठाकरेंना नमस्कार केला. हस्तांदोलन केले, मात्र शिंदेनी ठाकरेंशी नजरानजरही टाळली.
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी आपल्या कर्तुत्वाने मोठा होऊ शकतो, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि लोकशाहीने सामान्यांना दिलेली मोठी देणगी आहे,” अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी पूर्ण होत असून, त्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह विविध विभागाचे मंत्री यांच्यासह गटनेते व सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योगशास्त्रात एम. ए., पत्रकारितेचा अनुभव आणि मराठवाडा विभागात बारावीमध्ये गुणवत्ता यादीत सहावे स्थान मिळवणाऱ्या युवकाने जनतेच्या प्रश्नांची समज, ठाम भूमिका, विविध संस्थांबरोबर सामाजिक, क्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य, यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आंदोलने उभारून ती यशस्वी केली.
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आदींनी विरोधी पक्षनेते दानवे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.