मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख तथा तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याची बाब समोर आली आहे. भाजपने थेट शिवसेनेशीच बोलणी आणि व्यवहार करावा. शिंदे यांना पाठिंबा देऊ नये. सर्व आमदारांना घेऊन तुमच्याकडे येतो, असे उद्धव यांनी सांगितले होते. मात्र, फडणवीस यांनी त्यास स्पष्ट नकार दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्यात समोरासमोर बोलणी झाल्याचा दावा केला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही फोन केला. मात्र, त्यांनी उत्तर दिले नाही.
२०१९ मध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उद्धव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी उद्धव यांनी कोणतीही चर्चा नाकारली होती. त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आता उद्धव यांना प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचा संशय आल्याने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलविली. मात्र, तोपर्यंत शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह बेपत्ता झाले होते. हे सर्व जण सूरत येथे पोहचले. शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढत गेली. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी करणारे पत्र दिले. भाजपच्या आवाहनानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला ३० जून रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली, तसेच ते राज्य सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीस यांना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले.
भाजपने ठरवले की त्यांना उद्धव सोडून शिवसेना हवी आहे. त्यानंतर काही खासदारांनी नुकतेच उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. यानंतर उद्धव यांनी खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव यांनी सांगितले की, भाजप पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना कुठलेही यश आले नाही. खासदारांनाही भाजप नेतृत्वाकडून उत्तर मिळाले नाही. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रश्मी ठाकरे यांचा निरोप घेऊन जाण्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याशीही संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. मात्र शिंदे यांनी तडजोड करण्यास नकार दिला.
Uddhav Thackeray Contact with Devendra Fadanvis After Eknath Shinde Fly away