मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. यांदर्भात दादर येथील रहिवाशी गौरी भिडे व त्यांचे वडील अभय भिडे यांनी तक्रार केली होती. भिडे यांनी आता याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआयने हाती घ्यावा, असे निर्देश देण्याची मागणी भिडे यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. त्याच अनुषंगाने मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
न्यायालयाने राज्य सरकारकडून यावर स्पष्टीकरण मागवले असून उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच राज्यातील सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संकटात असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे गौरी भिडे आणि तिचे वडील अभय भिडे यांनी म्हटले आहे की, देशाचा एक प्रामाणिक आणि जागरुक नागरिक म्हणून आपण केंद्र सरकारला आणखी काही लपविलेल्या, उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी संपत्ती शोधून काढण्यासाठी काही प्रमाणात मदत करण्याचा विचार केला आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून जमवलेले पैसेही उघडकीस आणण्याचे ठरवले आहे, असा दावा याचिककर्तीने केला.
इतकेच नव्हे तर ठाकरे यांच्या मालकीचे सामना वृत्तपत्र आणि मार्मिक या साप्ताहिकाने करोना काळात कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप याचिकाकर्तीने केला. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कधीही कोणतीही विशिष्ट सेवा, व्यवसायाच्या उत्पन्नाचे अधिकृत स्रोत उघड केले नाहीत. तरीही त्यांच्याकडे मुंबईसारख्या शहरात आणि रायगड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे, असा दावाही भिडे यांनी केला. त्यातच गौरी भिडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र लिहून उद्धव ठाकरे यांच्या विरूध्द तक्रार दिली होती. ज्याची दखल घेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उद्धव ठाकरे याबाबत प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. गौरी भिडे यांच्या याचिकेवर राज्य सरकारने स्वत:हून कोर्टापुढे येत हे स्पष्टीकरण दिले. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने भिडे यांनी केलेल्या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे,
या प्रकरणात महत्त्वाची गोष्ट म्हणजे , मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेतून आरोप करण्यात आला आहे की, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची संपत्ती ही भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याशिवाय यातील प्रतिवादी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळच्या नातेवाईक असल्यानं त्यांचीही चौकशी या कायद्यानुसार व्हायला हवी. कारण पदाचा गैरवापर करत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक घोटाळे करत गोळा केलेला बेहिशोबी पैसा आहे, असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray and Family Mumbai Police Enquiry
Unaccounted Worth Wealth