मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार प्रत्येक नागरिकाला संपत्ती जमविण्याचा अधिकार असला तरी ती संपत्ती योग्य मार्गाने जमवलेली असावी, अन्यथा त्याची चौकशी होऊ शकते. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या संपत्तीची चौकशी होत असते. अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये खूपच वाढ झाली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मागे ईडीची चौकशी लागून सध्याचे तुरुंगात आहेत. त्या पाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील ईडी कडून चौकशी करावी, कारण यांनी इतकी संपत्ती तथा पैसा कुठून जमा केला अशी विचारणा करीत हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी संपत्तीची सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी व्हावी, अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालय यासंदर्भात काय निर्णय देणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी संपत्तीची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, असे म्हटले आहे. न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला आणि आर एम लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी होईल.
गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात सदर जनहित याचिका दाखल केली असून त्या दादर येथील रहिवासी आहेत. गौरी या प्रकाशक असून त्यांच्या आजोबाचे राजमुद्रा नावाचे प्रकाशन आहे. भिडे यांनी आरोप केला आहे की, सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा होणे शक्य नाही. कारण आपलाही हाच व्यवसाय असून दोघांच्या उत्पन्नात इतका फरक कसा असे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच या देशाची एक प्रामाणिक आणि दक्ष नागरिक म्हणून मी केंद्र सरकारला मदत करण्यासाठी लपवून ठेवलेली, बेहिशेबी संपत्ती बाहेर काढण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचे गौरी भिडे यांनी म्हटले आहे. गौरी भिडे यांचे वडील अभय भिडे हेदेखील याप्रकरणातील दुसरे याचिकाकर्ते आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या बेहिशेबी संपत्तीची केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या सात-आठ वर्षांपासून मी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ या संकल्पनेमुळे प्रेरित झाले आहे. तसेच काही नेत्यांनी आजपर्यंत जे काही खाल्ले आहे ते देखील मी बाहेर काढणार आहे. असे सांगत गौरी भिडे यांच्याकडून न्यायालयात काही कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचार करुन मोठ्याप्रमाणावर मालमत्ता आणि इतर संपत्ती जमवल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. त्यांच्याकडे येणाऱ्या उत्पन्नाचा स्रोत वैध नाही. ठाकरे कुटुंबीयांनी कधीही त्यांना कोणत्या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न मिळते, हे नमूद केलेले नाही, याकडे गौरी भिडे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून प्रबोधन प्रकाशन ट्रस्टसाठी महाराष्ट्र सरकारच्या सिडको विभागाने दिलेल्या भूखंडावर प्रश्न उपस्थित करण्याचे काम त्यांनी याचिकेतून केले आहे. त्याचप्रमाणे कोविड १९ च्या लॉकडाऊन काळात ठाकरेंची कंपनी प्रबोधन प्रकाशन प्रा. लिमिटेडने ४२ कोटी रुपयांचा कारभार आणि ११. ५ कोटी रुपयांचा लाभ मिळवला आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी व्हावी, असेही या याचिकेत म्हटले आहे.
Uddhav and Rashmi Thackeray Wealth ED CBI Enquiry