नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संपूर्ण देशभरात त्यांनी दिलेल्या विधानानंतर टीका सुरू झाली असून हा वाद आता जरा अधिकच चिघळला आहे.
सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तामिळनाडू सरकारच्या मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिलीय. उदयनिधी आणि ए राजा यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या विधानाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. न्यायालय या प्रकरणाची सुनावणी इतर प्रलंबित द्वेषपूर्ण भाषणांच्या याचिकांसह सुनावणी करेल, असे न्यायालयाने म्हटले. दरम्यान तामिळनाडूमध्ये सनातन धर्माविरोधात होणारे कार्यक्रम असंवैधानिक घोषित करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका चेन्नईच्या एका वकिलाने दाखल केली आहे.
संपूर्ण देशभरात प्रकरण तापूनही उदयनिधी स्टॅलिन आपल्या विधानावर ठाम आहेत. तसे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते सनातन धर्माबाबत सातत्याने वक्तव्ये करत आहेत. अस्पृश्यताही संपवण्यासाठी सनातन धर्म संपवला पाहिजे, असं उदयनिधी म्हणाले. दरम्यान उदयनिधी स्टॅलिन हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. ते तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री देखील आहेत.
डेंग्यू-मलेरियाशी केली होती तुलना
चेन्नई येथील एका कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिनने सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी केली होती. डेंग्यू-मलेरियावर फक्त प्रतिबंध करून उपयोग नाही , तर त्याचा नायनाट केला पाहिजे. त्याचप्रमाणे सनातन धर्माचना नायनाट करावा लागेल, असे उदयनिधी म्हणाले होते. दरम्यान सनातन धर्माबाबत विष ओकणाऱ्या स्टॅलिनला आपल्या वक्तव्याचा अजिबात पश्चाताप नाही.
Udayanidhi Stalin Supreme Court Notice Sanatan Dharma Statement