इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानातील उदयपूर येथील टेलर कन्हैयालालच्या निर्घृण हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत. या गुन्ह्यातील मारेकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध पुढे आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या दोघांची कसून चौकशी करीत आहेत. मारेकऱ्यांचे विशेषत: कराचीस्थित दावत-ए-इस्लामी या संघटनेशी संबंध निदर्शनास आले आहेत. या आरोपींनी वारंवार विविध परदेश दौरे केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. रियाझ अख्तारीसह कन्हैयालालचा शिरच्छेद करणाऱ्या गौस मोहम्मदला दावत-ए-इस्लामीच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी २०१४ मध्ये पाकिस्तानात बोलावले होते.
कराची-स्थित दावत-ए-इस्लामी या संघटनेचे उद्दीष्ट जागतिक स्तरावर शरिया कायद्याचे समर्थन करणे असे आहे. तसेच, त्या उद्देशाने कुराण आणि सुन्नाच्या शिकवणींचा प्रसार करणे आहे. पाकिस्तानमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत आणि इस्लामिक देशात ईशनिंदा कायद्याचे समर्थन करण्यास संघटना वचनबद्ध आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौस मोहम्मद कराचीत ४० दिवस राहिला आहे. २०१३ आणि २०१९ मध्ये तो उमराहसाठी सौदी अरेबियाला गेला होता. इतर आरोपींनी सौदी अरेबियासह परदेशातही प्रवास केला आहे.
गौस मोहम्मदला कराचीतील दावत-ए-इस्लामी कार्यकर्त्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते, तर दुसरा मारेकरी रियाझ अख्तारी हा राजस्थानच्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अल्पसंख्याक सेलमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत होता. दावत-ए-इस्लामी नेते इलियास अत्तार कादरी यांचा अनुयायी रियाझ अख्तारी हा भाजप नेते आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या कार्यकर्त्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यांनी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे सदस्य इर्शाद चैनवाला आणि भाजप कार्यकर्ता ताहिर रझा खान यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
अख्तारी यांनी आपल्या उद्देशासाठी भाजप कार्यालये आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची फेरफटका मारल्याचा आरोप आहे. भाजपने अख्तरीचा भगवा पक्षाशी संबंध असल्याचा आणि अख्तरीशी कोणताही संबंध असल्याच्या काँग्रेसच्या आरोपांचे खंडन केले आहे.
चौकशीदरम्यान, आरोपी रियाझ अख्तारीने भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल किंवा भगव्या पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल एक शब्दही उच्चारला नाही. दोन्ही आरोपी एनआयएच्या ताब्यात आहेत. दिल्ली आणि राजस्थानमधील अंतर्गत सुरक्षा तज्ञांच्या मते, अख्तारी किंवा गौस मोहम्मद या दोघांनीही भाजप नेत्यांना लक्ष्य करण्याचा कोणताही मोठा कट उघड केलेला नाही.
जयपूर येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयाने शनिवारी मोहम्मद रियाझ अख्तारी, गौस मोहम्मद आणि उदयपूर हत्याकांडात अटक केलेले त्यांचे साथीदार आसिफ आणि मोहसीन यांना 10 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले.
Udaipur kanhaiyya lal murder suspects investigation Islamic organization connection