इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत मनसे व ठाकरे गट एकत्र आल्यानंतर राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे स्पष्ट झाले होते. पण, आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले असून त्याची राजकीय चर्चा आता सुरु झाली आहे. तर विरोधकांनी या दोन्ही पक्षाने एकत्र आल्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही असे सांगत टीका केली आहे.
संजय राऊत यांनी काल ठाकरे बंधू मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, ठाणे या महापालिका एकत्र लढणार, असे सांगत ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात मोठं वक्तव्य केले. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू मुंबई, नाशिक, ठाण्यासह अनेक महानगरपालिका एकत्र लढणार असून तशी आमची एकमेकांशी चर्चा सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
तब्बल १८ वर्षांनी राज – उद्धव एकत्र
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी राज – उद्धव एकत्र आल्यामुळे मेळाव्यानिमित्त एकत्र आले. या दोन्ही बंधूचे एकत्र येण्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. आता या दोघांच्या एकत्र येण्याबरोबरच निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा खा. संजय राऊत यांनी केली आहे.