नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यभर गाजलेल्या हनी ट्रॅपची चौकशी व्हावी, नाशिक ड्रग्ज मुक्त करावे, यासह विविध २२ मागण्यांसाठी नाशिक येथे शिवसेना ठाकरे गट व मनसेचा संयुक्त मोर्चा आज काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत व मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सामील झाले होते. गेल्या काही दिवसांपासून उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्या भेटी सुरु असल्या तरी अद्याप युतीची अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. पण, त्याअगोदर नाशिकमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला. त्यामुळे राज्यभर याची चर्चा सुरु झाली. नाशिकनंतर हा मोर्चा पुणे येथे सुध्दा काढला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महापालिकेच्या तोंडावर या मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या तयारीसाठी शहरातील २२ ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर त्याची जोरदार तयारी करण्यात आली. ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी. सुर्यंवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक अंकुश पवार, सलीमामा हे सुध्दा सामील झाले होते.
या मोर्चाबाबत खा.संजय राऊत म्हणाले की, नाशिक सारख्या धार्मिक आणि क्रांतिकारी जिल्ह्यात आज अराजक माजले आहे. भ्रष्टाचारगुंडगिरी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खुलेआम ड्रग्स यामुळे नाशिक बदनाम होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची ही व्यथा असल्यामुळे आज शिवसेना मनसे तर्फे नाशकात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.