मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील बेस्टच्या पतपेढीसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे. दोन्ही पक्षाच्या युतीचे पॅनल या निवडणुकीत उतरले आहे. १८ ऑगस्ट रोजी ही निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत आता जागा वाटप सुध्दा समोर आले असून त्यात ठाकरे गट २१ पैकी १९ तर मनसे २ जागा लढणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे व उध्दव ठाकरे एकत्र आल्यानंतर युती होईल की नाही याबाबत सर्वत्र साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच पतपेढीच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी बेस्ट निर्णय घेऊन त्याची युतीची सुरुवात केली आहे. उध्दव ठाकरे यांनी थेट युती होणार असल्याचे स्पष्ट केले. पण, अद्यापपर्यंत राज ठाकरे यांनी आपले पत्ते गुलदस्त्यातच ठेवले होते. पण, या दोन्ही पक्षांनी बेस्टच्या पतपेढीसाठी होणा-या निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेची युती झाली आहे. त्यांनी प्रणि उत्कर्ष पॅनल तयार केले असून त्यांच्या पोस्टरवर ठाकरे ब्रॅण्ड असे लिहले आहे.