इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दहशतवादी पाकिस्तानचा कणा मोडण्यासाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबलेले नसतांना आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. आता या सामन्याच्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने माझं कुंकू – माझा देश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शिवसेनेची माहिला आघाडी १४ तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै असे हे आंदोलन असणार आहे. मोदींना महिला सिंदूर पाठवतील. ते अभियान सुध्दा आम्ही राबवणार आहोत. या मॅचचा निषेध आमचा पक्ष करेल. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. भाजप नेत्यांची पोरं अबुधाबीला मॅच बघायला जातील. जय शाह तर क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. अमित शाह आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो असे म्हणतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही.
पहलगाम दहशवादी हल्ल्यात २६ निरपराध लोक मारले गेले. त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे असे म्हणताय, पाकिस्तानचे कंबरडे मोडू असे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असे देखील म्हणाले. आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे असा प्रश्नही खा.राऊत यांनी उपस्थितीत केला. भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे ते त्यांनी सांगावं असे आव्हानही त्यांनी दिले.