मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात आज मोठी उलथा पालथ झाली. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अन्य ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यात चर्चांना जोरदार उधाण आले आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडी अतिशय कमजोर झाल्याचे बोलले जात आहे. यासर्व प्रकारावर आता ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की,
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न –
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही!
नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?? असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की,
आणि सर्वात महत्वाचं… आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.
मग आज भाजपाने काय केलं??
तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!
एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे!
‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे!