इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूर जिल्ह्यातील कडगाव येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली तसेच शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला, त्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी शेतक-यांनी निवेदनाद्वारे व्यथा मांडल्या.
उध्दव ठाकरे हे आज अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. त्यांनी या दौ-याची सुरुवात लातूर येथून केली. ते बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहे. येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती ते घेणार आहे.
यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, उभं पीक पाण्याखाली गेलंय आणि शेतीच्या बांधावरून बळीराजा मदतीसाठी सरकारकडे आक्रोश करतोय पण सरकार मात्र मदतीची कोणतीच ठोस शाश्वती देत नाहीय, अशावेळी बळीराजाने करायचं काय? अशा संकटाच्या काळी आम्ही तुमच्यासोबत आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारला तात्काळा मदत करण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, मी राजकारण करायला आलो नसल्याचाही टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. यावेळी त्यांना काही शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यावेळी ते म्हणाले की हात जोडून विनंती आहे. कोणतंही टोकाचे पऊल टाकू नका. आत्महत्या करु नका. या संकटाला सामोरं जायचं आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
या दौऱ्यादरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी उपस्थित होते.