मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिवसेना ठाकरे गटाकडून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील अपप्रचारबाबत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये वाद रंगला आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर असताना शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो वापरत आहेत. या प्रकरणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पनवेल मतदारसंघामध्येदेखील अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हेदेखील महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्याचे फोटो वापरत आहेत.
मंहाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो प्रचारात वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अलिबाग येथे शेकापच्या उमेदवाराला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे, तर उरण, पेण आणि पनवेल येथे शेकापने तसेच ठाकरे गटानेदेखील उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि शेकापमध्ये सामना रंगला आहे.