यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अदानी हा राक्षस मुंबईपुरता नाही, तर चंद्रपूरमधील शाळादेखील त्याला दिली. मुंबई, वाढवण बंदरही त्याला देण्याचा डाव आहे. भूमिपुत्रांच्या उपजीवेकवर वरवंटा फिरवणाऱ्यांना आमचा विरोध आहे. वीजसुद्धा अदाणीकडून घ्यावी लागणार आणि हे सर्व गुजरातच्या विकासासाठी होत आहे. आम्ही काय भांडी घासायची का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लिम वाद लावत आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणा देताहेत; पण आम्ही ‘बटेंगे भी नही और कटेंगे भी नही! पर ध्यान रखो हम आपको लुटने भी नहीं देंगे! भाजपची ‘महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों को बाटेंगे’ ही जी नीती आहे, ती उधळून लावू, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर टीका केली.
यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेत आले असता ठाकरे यांच्या बॅगेची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. यावर ते संतप्त झाले. जशी माझी बॅग तपासली तशी मोदी, शाह यांच्या बॅगा तपासता का, असा सवाल त्यांनी केला. एकनाथ शिंदेचा उल्लेख दाढीवाला, अजित पवार यांचा उल्लेख जॅकेटवाला आणि फडणवीस यांचा उल्लेख टरबुज असा करत त्यांच्याही बॅग तपासायला हव्यात, की नकोत, असा सवाल त्यांनी केला.
त्यांच्या बॅगा जर निवडणूक अधिकारी तपासणार नसतील, तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील, तिथे पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पुढे यायचे नाही. असा इशारा ठाकरे यांनी दिला. ते म्हणाले, की निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना जसा आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार आहे, तशा त्यांच्याही बॅगा तपासण्याचा आहे. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून शिंदे यांच्या बॅगाच्या बॅगा चालल्या होत्या. म्हणे कपड्याचा बॅगा होत्या, एवढे कपडे घालता तुम्ही, एकतर उन्हाळा होता; पण यावर कोणी बोलत नाही, लोकशाहीमध्ये कोणी छोटा नाही आणि कोणी मोठा नाही.
मोदी, शाह यांचा संविधान बलण्याचा मनसुबा आहे, म्हणून तर त्यांच्या राज्यात सभा वाढल्या आहेत. मोदी-शाह किती सभा घेत आहेत, मला म्हणताहेत की हिंमत असेल तर; पण मी तुमच्यावर बोलतो अजून किती हिंमत दाखवायची, असा सवाल करून ठाकरे म्हणाले, की ३७० कलम हटविण्याच्या वेळी मी सोबत होतो. काश्मीरमधील ३७० कलम हटवले; पण सोयाबीनला भाव मिळतो का? पीकविमा, नुकसानभरपाई मिळते का? काश्मीरच्या ३७० कलमाचा माझ्या शेतकऱ्यांशी आणि इथल्या रोजगाराशी काही संबंध नाही. मोदी यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मते मागावी लागत आहेत, ही त्यांची पुण्याई आहे. राज्यात मोदी हमी चालत नाही, तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाणे चालते. आज तुम्ही महिलांना १५०० रुपये देत आहात; पण नोटाबंदीत याच महिलांना घरात मागच्या हाताने ठेवलेले धन लुटले. त्याची किंमत शून्य झाली. जसे काश्मीरमध्ये गेलात, तसे मणिपूरमध्ये अजून का गेला नाहीत, आजही तिथे अत्याचार सुरू आहेत, इकडे मोदी, शाह यांचे भाषण सुरू असताना तिकडे एका आदिवासी महिलेला जाळून टाकले त्याबद्दल कोणी बोलतच नाही, अशी टीका त्यांनी केली.
भाजपचे करंटे लोक कुणबी समाजाबद्दल द्वेषपूर्ण बोलले. समाजाबद्दल काहीही बोलाल; पण लक्षात ठेवा महाराष्ट्रात गांडुळांची नाही तर तर वाघांची पैदास होते. चंद्रपूर हादेखील वाघांचा परिसर आहे. बहिण-भावाच्या नात्याबद्दल वाईट बोलणाऱ्या सुधील मुनगंटीवारांनादेखील चंद्रपूरकरांनी आडवे करुन टाकले. मला हिंदुत्वावरून बोलणाऱ्या मोदींना हा माणूस आजही महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चालतो. कुणबी समाजाबाबच द्वेषपूर्ण बोलणारी माणसे मोदीजी तुम्हाला चालतात? असा सवाल ठाकरे यांनी केला.
नाशिक : शहरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळया भागात राहणारी तीन मुले नुकतीच बेपत्ता झाली आहेत. त्यात १४ वर्षीय मुलासह दोन मुलींचा समावेश आहे. सदर मुलांना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय कुटूबियांनी वर्तविला असून याप्रकरणी आडगाव,इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वडाळागावातील मुलगा शुक्रवार (दि.८) पासून बेपत्ता आहे. कुणासही काही एक न सांगता तो दुपारच्या सुमारात घराबाहेर पडला होता मात्र अद्याप परतला नाही. कुणी तरी त्याचे अपहरण केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत. दुसरी घटना आडगाव शिवारात घडली. इच्छामणीनगर भागात राहणारी अल्पवयीन मुलगी गेल्या गुरूवार (दि.७) पासून बेपत्ता आहे. तिचे कुणी तरी अपहरण केल्याचा आरोप तिच्या आईने केला असून याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. तिसरी घटना सिडकोतील महाराणा प्रताप चौक भागात घडली. परिसरात राहणारी १७ वर्षीय युवती रविवारी (दि.१०) दुपार पासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने कुटूंबियाने पोलीसात धाव घेतली असून, तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रौंदळे करीत आहेत.