अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुम्ही जर लहान मुलांना घेऊन दुचाकी चालवणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. सर्वसाधारणपणे लहान मुलांसोबत दुचाकी चालवण्याचे प्रमाण भारतात मोठे आहे. आणि आता त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, चार वर्षांखालील मुलांना मोटारसायकलवर बसवण्याबाबत नवीन नियम असणार आहेत. याअंतर्गत मुलांसाठी हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट बंधनकारक करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार जर चार वर्षांचे मूल मागच्या सीटवर बसले असेल तर बाइकचा वेग ४० किमी प्रतितास पेक्षा जास्त नसावा. नवीन नियम पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपासून लागू होतील.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, धोकादायक किंवा धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला व्हेईकल मॉनिटरिंग सिस्टीम यंत्र बसवले जाईल. याबाबत संबंधितांकडून ३० दिवसांत सूचना मागविण्यात आल्या आहेत. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये दुरुस्ती करून मोटारसायकलवरून नऊ महिने ते चार वर्षे वयोगटातील मुलांच्या सुरक्षेसाठी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रथमच नियम तयार केले आहेत. मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोटारसायकलवरील मुलांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतेही नियम नसल्यामुळे बहुतेक मुले अपघातांना बळी पडतात. एवढेच नाही तर दुचाकीचा तोल थोडासाही बिघडला तर मुले पडण्याचाही धोका असतो. देशातील रस्ते अपघात आणि मृत्यू आणि जखमींच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर मुलांसाठी नवीन नियम बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले की, सर्व संबंधित, तज्ज्ञ आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेऊन हे नियम अंतिम करण्यात आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अधिसूचित झाल्यानंतर एक वर्षानंतर लागू होणाऱ्या या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असेल. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ते वाहतूकीच्या संदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र, लहान मुलांच्या सुरक्षेचा विचार करता या नियमांचे पालन होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.