पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – मराठीत असे म्हणतात की, काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या दुर्घटनेत व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. परंतु दैव बलवत्तर म्हणून ती व्यक्ती बालम बाल वाचते. अगदी शेवटच्या क्षणी मृत्यूच्या दाढेतून वाचण्याची घटना पुण्यानजीक घडली आहे. वाहनचालकाचा बेशिस्तपणा आणि घाईमुळे हा अपघात घडला आहे. एका कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात हा सर्व थरारक अपघात कैद झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात एक बाईकस्वार थेट कंटेनरखाली आला. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला आहे.
बाईक कारच्या बोनेटला जोरदार धडकते आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या अपघाताने दुचाकीस्वारांचा बेशिस्तपणा आणि अतिउत्साह जीववार बेतू शकतो, हे ठळकपणे अधोरेखित केले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये कंटेनरला ओव्हर टेक करण्याच्या नादात बाईक समोरुन येणाऱ्या कारला धडकली. तळेगाव-चाकण रोडवर हा अपघात झाला. कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात अपघाताची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं कैद झालीत. या अपघातात बाळू गेणू शिळवणे हा दुचाकीचालक गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दृश्य बघता केवळ दैव बलवत्तर असल्यानेच तो वाचला असल्याचं पाहायला मिळत आहे.
हिरो होंडा बाईकवरुन बाळू शिळवणे हा तरुण जात होता. एका कंटेनरला तो ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्ना होता. रस्त्याच्या पूर्णपणे बाजूला आलेली त्याची बाईक तो पुन्हा ओव्हरटेक करुन डाव्या लेनमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. पण इतक्यात समोरुन येणाऱ्या कारच्या वेगाचा त्याला अंदाज आला नाही. विशेष म्हणजे डाव्या लेनमध्ये बाईक आणण्याच्या आधीच समोरुन येणाऱ्या कारच्या उजव्या बाजूला त्याच्या बाईकचा धक्का लागतो आणि दुचाकीस्वार बाळू शिळवणे हा तरुण जागीच कोसळतो. कंटेरनच्या खाली येऊन दुचाकीस्वार चिरडला जाण्याचीही भीती होती.
https://twitter.com/ssidsawant/status/1561547417543389184?s=20&t=byzLtheSWHkXBZvCYYwqbg
पण नशीब बलवत्तर म्हणून हा तरुण अगदी थोडक्यात बचावला. मात्र सततच्या पावसामुळे रस्ता निसरडा झालेला होता. त्यात कारला धडक देऊन खाली कोसळल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाला खरचटलंय. पण त्याचा जीव वाचलाय. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओमध्ये रस्ते अपघातांची तिव्रता स्पष्ट केली आहे. वाहन चालकांनी या अपघातापासून धडा घेण्याची गरज आहे.
Two Wheeler and Container Road Accident Video