मुंबई/पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणली आहे. त्यामुळे त्याचे विविध परिणाम घडत आहेत. सध्या बाजारात यामुळे काय चित्र निर्माण झाले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत, जे पाहून तुम्हीही थक्कच व्हाल…
संभ्रमाचे वातावरण
२ हजार रुपयांची नोट येत्या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहे किंवा आपल्या खात्यात जमा करता येणार आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करुन बदलण्याची मुदत असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. कुठलीही गोंधळाची किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ४ महिन्यांचा कालावधी नोटा बदलीसाठी देण्यात आलेला असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. फक्त एकावेळी २० हजार रुपये बदलता येणार आहेत. तसे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. तरीही सध्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
सोने खरेदी वाढली
२ हजारांची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढला आहे. सुमारे ३ टक्के जीएसटी चुकता करीत मोठ्या प्रमाणात ग्राहक सोन्याची नाणी आणि दागिन्यांची खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सोन्याची विक्री चक्क तिप्पट झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचे दर ४०० रुपयांनी वाढले. ६१,२०० असे दर असतानाही ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह होता. खरेदी वाढल्याने जोखिम नको म्हणून २ हजारांच्या नोटांनी ५० हजारांपर्यंत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून केवायसी व २ लाखांपर्यंत पॅनकार्डची झेरॉक्स बंधनकारक केली आहे.
शिर्डी मंदिरात सतर्कता
जुन्या पाचशे व हजाराच्या सुमारे साडेतीन कोटीच्या नोटा अद्यापही शिर्डीतीस साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. आता दोन हजारांची नोटांच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क झाले आहे. दि. ३० सप्टेंबरनंतर भाविकांनी दोन हजाराच्या नोटा दानपेटीत टाकू नयेत. असे आवाहन संस्थानचे सीईओ पी. शिवाशंकर यांनी केले आहे.
जिल्हा बँकाही बुचकळ्यात
अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयातही १२ कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पडून असलेल्या जुन्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करनही नोटा बदलून मिळाल्या नाहीत.
दुकानदारांचा नकार
मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह आदी शहरांमध्ये किराणा दुकान, भाजीपाला, पेट्रोल पंप याशिवाय काही मोठ्या व्यवहारात २ हजारांच्या नोटा चालविण्यास नागरिकांनी भर दिल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात येत आहे. व्यवहारात अचानक २ हजारांच्या नोटा वाढल्याने सुटे पैसे देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बँकांचा नाठाळपणा
नोटा बँकेत जमा करण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत या नोटा चलनात असतील. मात्र, आतापासूनच काही बँकांनी नोटा स्वीकारणार नसल्याचे फलक लावले आहेत. नागरिकांनी दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सकाळीच बँकांसमोर रांगा लावल्या. सोमवारनंतर बँकेत नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तर जळगाव जिल्हा बँक शाखेत दोन हजारांच्या नोटा सोमवारपासून स्वीकारू नयेत, असे आदेश वरिष्ठांडून आले आहेत. ग्राहकांनी बँकेत भरणा केला मात्र दुपारी अचानक सूचना आल्या की, सोमवारपासून या नोटा स्वीकारू नयेत, असे म्हटले आहे.
Two Thousand Notes Market Situation