नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी ) नागरी सेवा परीक्षांचा निकाल जाहीर झाले असून या परीक्षेत देशभरातील अनेक राज्यांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत मुलांबरोबरच मुलींनीही मोठे यश संपादन केले असून टॉपरमध्ये बाजी मारली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये दोन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याने कुटुंबासह नातेवाईकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या दोन्ही भगिनींचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या यशाची चर्चा होत आहे.
दिल्लीच्या रहिवासी सृष्टी आणि सिमरन या दोन बहिणींनी मिळून नागरी सेवा परीक्षेत यश मिळवून इतिहास रचला आहे. या परिक्षेत सृष्टीला 373 वा रँक आणि सिमरनला 474 वा रँक मिळाला आहे. दोन्ही बहिणींनी अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्र पदवी मिळवल्यानंतर, त्यांनी लाखो बहुराष्ट्रीय कंपन्यांचे पॅकेज सोडून वडील नीरज कुमार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांचे मूळचे आग्राचे असून ते सध्या दिल्ली मध्ये राहत आहेत. मात्र घराच्या लहान आकारामुळे अभ्यासाला जागा नव्हती, त्यामुळे दोन्ही बहिणी जवळच्या लायब्ररीत जाऊन तयारी करायच्या. त्यांचे कुटुंबात वडील नीरज कुमार बांधकाम आणि मालमत्ता क्षेत्रात नोकरी करतात आणि आई सुमन गृहिणी आहेत.
परीक्षेतील यशाबद्दल सांगताना सृष्टी आणि सिमरन म्हणतात की, विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करताना कठोर परिश्रम आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करून, १०० टक्के देऊन तयारी करावी, म्हणजे यश आवश्यक मिळते.
तसेच बीटेक उत्तीर्ण सिमरन तिच्या यशाबद्दल म्हणते की, लहानपणापासून आमचे पप्पा आम्हाला आयएएस होण्यासाठी प्रेरणा देत असत. तसेच मला विज्ञान विषय आवडत असला तरी मी महाविद्यालयात दुर्गा शक्ती नागपाल बद्दल ऐकले, तेव्हा नागरी सेवेत येण्याची इच्छा माझ्यामध्येही जागृत झाली. मला परदेशी सेवा निवडायची आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न आहे.
तर आपल्या यशाबद्दल सृष्टी हिने सांगितले की, लहानपणापासूनच माझे वडील मला दीदीसारखे आयएएस बनवण्यासाठी प्रेरणा देत असत. पण शालेय शिक्षणानंतर मी दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इकॉनॉमिक्स ऑनर्सला प्रवेश घेतला. त्यानंतर अंतिम वर्षात वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची तयारी सुरू केली.