श्रीनगर – हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी नवीद बाबू याच्यासाठी काम करणारे निलंबित डीएसपी देविंद्र सिंह तसेच देशविरोधी कामात आढळलेल्या दोन सरकारी प्राध्यापकांना जम्मू-काश्मीर सरकारकडून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी हे लोक धोकादायक असल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. गेल्या एक महिन्या दरम्यान दहशतवादी आणि देशविरोधी कामे करणा-या जवळपास ६ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सेवामुक्त झाले आहेत. यामध्ये एका प्राध्यापकांचा सहाय्यक आणि एक नायब तहसीलदाराचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांत डीएसपी असलेल्या देविंद्र सिंह यांना ११ जानेवारी २०२० मध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका पथकाने श्रीनगर-जम्मू महामार्गावर दक्षिण काश्मीरच्या अल स्टाप काजीगुंडजवळ पकडले होते. देविंद्र सिंह यांच्यासोबत त्या वेळी कारमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा सात लाखांचे बक्षीस असलेला दहशतवादी मुश्ताक ऊर्फ नवीद बाबू आणि लष्कर ए तोय्यबाचा दहशतवादी रफी राथर तसेच दहशतवाद्यांचा वकील अॅड. इरफान शफी मीर बसलेले होते.
देविंद्र सिंह आपल्या पदाचा दुरुपयोग करून सुरक्षा दलांपासून वाचवत दहशतवाद्यांना जम्मूला पोहोचविण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या अटकेदरम्यान दहशतवाद्यांकडून हत्यारांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. पोलिस दलाने त्यांना तत्काळ निलंबित केले होते. तसेच तपासासाठी त्यांना एनआयएच्या हवाली केले होते. देविंद्र सिंह यांच्याशिवाय उत्तर काश्मीरमधील दोन प्राध्यापक मोहम्मज युसूफ गनई (रा. त्रिच, कुपवाडा) आणि बशीर अहमद शेख (रा. दिलदार बटपोरा, कर्नाह, कुपवाडा) यांनाही सेवामुक्त करण्यात आले आहे.