इंडिया दर्पण ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे महामार्गावर लॉयर्स कॉलनीच्या वळणावर बुधवारी सायंकाळी एक कार आगीत भस्मसात झाली. कारमध्ये चालकासह दोन जण प्रवास करत होते. चालकाने खिडकीबाहेर उडी मारली आणि त्यानंतर त्याच्या साथीदाराला बाहेर काढले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. नंतर अग्निशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत गुटख्यामुळे दोघांचा जीव वाचल्याची बाब समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फाजिल (बेबर, मैनपुरी) म्हणाले, की तो अनुपम दीक्षित (प्रेमदास मोहल्ला, मैनपुरी) यांचे चालक आहे. त्याचे मालक प्रॉपर्टी डिलर आहे. आग्रा येथे एमजी रोडला एका शो रूमवर मालकाला कपडे बदलायचे होते. कारमध्ये एसी सुरू होता. सर्व काचा बंद होत्या. चालक गुटखा खातो. दुर्घटनेच्या काही वेळापूर्वी त्याने थुंकण्यासाठी चालकाच्या बाजूची काच खाली केली होती.
लॉयर्स कॉलनी वळणावर अचानक कारच्या पुढील भागात आग लागली. तो आणि गोपाल भदौरिया खूप घाबरले. सेंट्रल लॉकिंग सिस्टिम नादुरुस्त झाली. त्याच्या बाजूची काच उघडी होती. तो खिडकीतून बाहेर पडला. बाहेरून दरवाजा उघडून भदौरिया यांना बाहेर काढले. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. पाणी टाकून नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने तोपर्यंत रौद्र रूप धारण केले होते. अग्निशामक दलाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवले. कारमध्ये चालकाने आग्रा येथे डेंट-पेंट करवून घेतले होते. तसेच शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती नवीन आग्र्याचे पोलिस अधिकारी अरविंद निर्वाळ यांनी दिली.