मुंबई – देशभरात अनेक ठिकाणी दोन बस गाड्या, दोन माल ट्रक किंवा दोन रेल्वे यांचे अपघात होतांना आपण नेहमीच पाहतो. परंतु दोन विमानांची टक्कर ही घटना दुर्मिळ आणि भयानकच म्हणावी लागेल. अशीच दुर्घटना होता होता वाचली. एअर एशिया इंडियाचे अहमदाबाद-चेन्नई विमान आणि इंडिगोचे बंगळुरू-वडोदरा विमान या दोघांची २९ जानेवारी रोजी एकमेकांना टक्कर देण्यापासून थोडक्यात बचावले होते, असा धक्कादायक खुलासा एअरक्राफ्ट अपघात अन्वेषण ब्युरोच्या (एएआयबी) अहवालात करण्यात आला आहे.
तपास अहवालात म्हटले आहे की, दोन्ही विमाने आठ किलोमीटरच्या परिघात आली. त्यांचे अंतर हवाई क्षेत्रापेक्षा फक्त ३०० फूट कमी करण्यात आले होते, या गंभीर चूकीचे एक संभाव्य कारण म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलरची या परिस्थितीबद्दल जागरूकता नसणे आहे. दुसरे संभाव्य कारण म्हणजे मुंबई विमानतळावरील परिस्थितीचे मूल्यांकन कंट्रोलरने आधी किंवा आगाऊ केले होते.
अहवालात म्हटले आहे की, अहमदाबादहून दक्षिण भारताकडे जाणारी बहुतांश उड्डाणे भावनगरवरून जातात. तथापि, २९ जानेवारी रोजी एअर एशिया इंडियाचे विमान मात्र मुंबई विमानतळावर अन्य विमानाकरिता वापरल्या जाणाऱ्या धावपट्टीवर होते. त्यामुळे एअर एशिया इंडियाच्या विमानाने मार्ग बदलल्याने आणि विरुद्ध दिशेने येणारे इंडिगोचे विमान थेट मार्गावर असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पुरेसे अंतर राखले गेले नाही, तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या स्वयंचलित यंत्रणेने अपघाताची पूर्वसूचना देणारा इशारा जारी केला, असे अहवालात म्हटले आहे. तथापि, कंट्रोलरने व्हिज्युअल अनुमानित इशाऱ्याकडे (चेतावणीकडे ) लक्ष दिले नाही. एअर एशिया इंडियाचे विमान भावनगरहून नेहमीच्या मार्गावर आहे, असे गृहीत धरून कंट्रोलरने त्याच्या पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे एअर एशिया इंडियाचे फ्लाइट इंडिगो फ्लाइटच्या अगदी जवळ नाही, असा अंदाज केला.
कंट्रोलरला परिस्थितीची जाणीव होईपर्यंत एअर एशिया इंडियाचे विमान 38,008 फूट उंचीवर पोहोचले होते, तर इंडिगोचे विमान 38,000 फूट उंचीवर उडत होते. त्यामुळे दोन्ही विमानांमध्ये हवेत अत्यंत कमी अंतर राहिले होते. परंतु सुदैवाने हा अपघात टळला.