मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय रेल्वेसाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण दोन रेल्वेंची समोरासमोर टक्कर होता होता वाचली. तुम्हाला ऐकायला कदाचित विचित्र वाटत असेल. पण, दोन रेल्वेंची टक्कर ऐतिहासिक कशी असू शकते. परंतु हे खरे आहे. दोन रेल्वेच्या टकरीमध्ये कवच तंत्रज्ञानाच्या विश्वासाची परीक्षा घेण्यात आली. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी कवच रेल्वेची टक्कर होऊ न देणे, या विश्वासाची पारख करण्यात आली. हा विश्वास पारखण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः या रेल्वेत प्रवास केला. तर दुसऱ्या रेल्वेत सर्व वरिष्ठ अधिकारी प्रवास करीत होते.
रेल्वे मंत्रालयाने अनेक वर्षे संशोधन करून कवच तंत्रज्ञान विकसित केले आहे. हैदराबादमधील सिकंदराबादमध्ये या रेल्वेचे परीक्षण करण्यात आले. हे तंत्रज्ञान इतके अचूक आहे की, दोन रेल्वे पूर्ण वेगात समोरासमोर आल्या तरी त्यांची टक्कर होऊ शकत नाही. लाल सिग्नल पार करताच रेल्वेमधील ब्रेक आपोआप लागतील आणि पाच किलोमीटरच्या परिसरातील सर्व रेल्वे थांबतील. मागून येणारी रेल्वेसुद्धा सुरक्षित राहणार आहे. लाल सिग्नलवर कवच तंत्रज्ञानाने युक्त रेल्वेचे पूर्ण क्षमतेच्या वेगाने धावण्याचे परीक्षण घेण्यात आले. यादरम्यान रेल्वेचे स्वयंचलित ब्रेक ५०० मीटर आधीच लागले. पाच किलोमीटर परिसराच्या कक्षेतील सर्व धावणाऱ्या रेल्वे आपोआप थांबल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २० हजार किमी रेल्वे नेटवर्क, इंजिन, रेल्वे स्थानकांवर कवच तंत्रज्ञान लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-जम्मू, चेन्नई-कोलकाता आदी रहदारी असणाऱ्या रेल्वे नेटवर्क कव्हर करण्यात येणार आहे. विभागीय रेल्वेमध्ये निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. आगामी २०२४ पर्यंत कवच तंत्रज्ञान लावण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
भारत में बना – भारत का कवच।#BharatKaKavach pic.twitter.com/gGQRfFKNCM
— Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) (@AshwiniVaishnaw) March 4, 2022
रेल्वे चालवताना लोको पायलटच्या सर्व क्रियाकलापांचे जसे ब्रेक, हॉर्न, थ्रोटल हँडल आदी गोष्टींचे कवच तंत्रज्ञान देखरेख ठेवणार आहे. चालकाकडून कोणतीही चूक झाल्यास कवच तंत्रज्ञानाकडून ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून अलर्ट केले जाणार आहे. चालकाकडून प्रतिक्रिया न मिळाल्यास रेल्वेचे ब्रेक आपोआप लागणार आहेत. त्याशिवाय निर्धारित वेगाहून अधिक वेगाने रेल्वे धावू शकणार नाही. कवचमध्ये रेल्वे इंजिनच्या आत आरएफआयडी डिव्हाइस, सिग्नल यंत्रणा, रेल्वे स्थानकावर लावले जाणार आहे. कवच प्रणाली जीपीएस, रेडिओ फ्रिक्वेन्सी आदी तंत्रज्ञानाने चालवली जाणार आहे.
असे आहे कवच तंत्रज्ञान
– लाल सिग्नलच्या ५०० मीटर आधी रेल्वेत स्वयंचलित ब्रेक लागणार
– पाच किलोमीटर क्षेत्रातील सर्व धावणाऱ्या रेल्वे आपोआप थांबतील
– हे तंत्रज्ञान ब्रेक, हॉर्न, थ्रोटल हँडल आदीची देखरेख स्वतः ठेवणार
– चालकाकडून चूक झाल्यास ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून अलर्ट करणार
– चालकाकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यास कवच तंत्रज्ञान स्वतः रेल्वे थांबवणार
– चालक जर निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने रेल्वे चालवत असल्यास ब्रेक लागणार
– आरएफआयडी डिव्हाइस (मशीन) रेल्वे इंजिनाच्या आत, सिग्नल यंत्रणा, स्थानकांवर लावणार
– कवच प्रणाली जीपीएस आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आदी तंत्रज्ञानाने चालवली जाणार आहे.