वृंदावन, उत्तर प्रदेश (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच विविध राज्यांमधील मंदिरात मात्र भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. त्यातच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागत असून मंदिर व्यवस्थापन समिती, पुजारी, साधू- महंत आणि भाविकांमध्ये विविध कारणांवरून एकमेकांत वादही निर्माण होत आहेत. अशाच प्रकारची एक घटना वृंदावन शहरात घडली. दक्षिणा घेण्यावरुन पुरोहितांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. आता या प्रकरणाची पोलिस चौकशी करीत आहेत.
जगप्रसिद्ध ठाकूरजी श्री बंके बिहारी मंदिरात सोमवारी पुन्हा एकदा परंपरांच्या बाबत वाद आणि गोंधळ उडाला. भाविकांना दर्शन देण्याच्या मुद्द्यावरून मंदिरातील गोस्वामींच्या दोन गटात हाणामारी झाली. मंदिर परिसरात दोन्ही बाजूंनी जोरदार लाथा-बुक्क्या झाल्या. यादरम्यान एका गोस्वामींचा दातही तुटला. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी फिर्याद देण्यात आली आहे. मंदिर परिसरात गोस्वामींच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्री ठाकुरजींचे दरवाजेही मंदिरातील गोस्वामींनी सुमारे अर्धा तास बंद ठेवले होते. त्याचवेळी मंदिराच्या व्यवस्थापकाने आपला अहवाल मथुरा धर्मदाय आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बांकेबिहारी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिर उघडल्यानंतर एक तासानंतर मोहित गोस्वामी आपल्या जवळच्या भाविकाला नऊ वाजता भेटायला घेऊन आले. यादरम्यान सेवात असलेले शैलेंद्र गोस्वामी आणि मोहित गोस्वामी यांच्यात दक्षिणा घेण्या-देण्यावरून वाद झाला. या वादाने काही वेळातच हाणामारीचे रूप धारण केले आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. शैलेंद्र गोस्वामीच्या कुटुंबीयांनी मोहित गोस्वामीला बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराच्या आवारात यांच्यात सुरू झालेली हाणामारी गेट क्रमांक एकपर्यंत पोहोचली. सुमारे पंधरा मिनिटे दोन्ही बाजूंमधील हाणामारी सुरू होती. या घटनेमुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये घबराट पसरली.
https://twitter.com/NikhilCh_/status/1477909299066068993?s=20
मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच मोहितच्या कुटुंबीयांनीही मंदिर गाठले आणि मारामारीत जखमी झालेल्या मोहितला पोलिस ठाण्यात नेले. जेथे शैलेंद्र गोस्वामी यांच्यासह सुमारे अर्धा डझन लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. इकडे शैलेंद्र गोस्वामी यांनीही मोहितविरोधात तक्रार दाखल केली आहे. या भांडणानंतर सेवात असलेल्या गोस्वामी यांनी सुमारे अर्धा तास मंदिराचे दरवाजे बंद केले, असा आरोप करण्यात येत आहे. मंदिरातील गोस्वामींमध्ये झालेल्या भांडणाचा आणि मंदिराचे दरवाजे सुमारे वीस मिनिटे बंद करण्यात आल्याचा अहवाल मंदिर प्रशासक, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभागाकडे पाठविण्यात आला आहे, असे ठाकूर बांके बिहारी मंदिराचे व्यवस्थापक मुनीश शर्मा यांनी सांगितले.
ख्रिसमसच्या दिवशीही गोस्वामी मंदिरात भक्तांना शिष्टाचाराच्या विरोधात देवाच्या मूर्तीचे दर्शन देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी मंदिर व्यवस्थापनाकडून चौकशी करण्यात आली आहे. वास्तविक सारस्वत ब्राह्मण समाजातील गोस्वामींना ठाकूर बांके बिहारी मंदिरात सेवा करण्याचा अधिकार आहे. दररोज तीन वेळा सेवा आहे. यात मूर्तीचा साजश्रृंगार (मेकअप), पूजाआर्चा आणि सेज (झोपेचा) आनंद, महाप्रसाद तथा शाही भोग सेवा करणारे बहुतेक जण ती सेवा करतात, मात्र यात सेज सेवा करणारी कुटुंबे वेगळी असतात. सोमवारीही राजभोग सेवा आणि शयन भोग सेवा यांच्या संदर्भात वाद झाला.