मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाईद्वारे १३३.६८ कोटीच्या रुपयांच्या खोटया बिलांद्वारे शासनाची १९.९३ कोटी रुपयांची महसूल हानी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे.
मे. देवराम ट्रेडर्स व मे. अपोलो एंटरप्राईज या व्यापा-यांच्या उल्हासनगर व नालासोपारा येथील ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती, अन्वेषण भेटी दरम्यान या व्यापाऱ्यांनी बनावट वीजबिल, आधार आणि पॅनकार्ड द्वारे नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहीमेअंतर्गत संबंधित कंपन्यांचे मालक अनिल देवराम जाधव व संतोष अशोक शिंदे यांना अटक करण्यात आली.
महानगर दंडाधिका-यांनी या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त, (अन्वेषण-अ, मुंबई) राहुल द्विवेदी (भा.प्र.से.) व राज्यकर उप आयुक्त संजय वि. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिये व रविकांत कांबळे यांनी केली.
या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण सोळा जणांना अटक केले आहे. सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणा-या व्यापा-यांचा शोध घेत असल्याने अटक कारवायांच्या वाढत्या संख्येदवारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-यांस कडक इशारा दिला आहे.