मुंबई – भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे ट्विटरचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असतील. पराग हे सध्याचे सीईओ जॅक डोर्सी यांची जागा घेतील. सध्या पराग अग्रवाल हे ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आहेत. विशेष म्हणजे अग्रवाल, आयआयटी बॉम्बे आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून १० वर्षांपूर्वी ते ट्विटरमध्ये सामील झाले.
ट्विटरने कळवले की, जॅक डोर्सीने सीईओ पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे आणि संचालक मंडळाने पराग अग्रवाल यांची एकमताने सीईओ आणि बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे, तथापि, पायउतार झाल्यानंतरही डोर्सी २०२२ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत बोर्डावर राहतील. तसेच पराग यांच्यावर ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून विश्वास असल्याचे सांगत डॉर्सीने राजीनामा जाहीर केला. पराग यांचे गेल्या १० वर्षातील काम चांगले आहे. मात्र नेतृत्व करण्याची त्यांची पहिलीच वेळ आली आहे.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या संदेशात डोर्सी म्हणाले की, कंपनीत जवळपास १६ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनीचे सह-संस्थापक, चेअरमनपासून सीईओसह कार्यकारी अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली असून आता त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचवेळी सन २०११ पासून ट्विटरवर कार्यरत असलेले अग्रवाल म्हणाले की, महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही अलीकडेच आमची रणनीती अपडेट केली आहे आणि माझा विश्वास आहे की धोरण धाडसी आणि योग्य असावे, परंतु आमचे महत्त्वाचे आव्हान हे आहे की आम्ही कसे त्याविरुद्ध काम करणे आणि परिणाम देणे. अशा प्रकारे आम्ही ट्विटरला सर्वोत्तम बनवू शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे बोर्ड गेल्या वर्षभरापासून डोर्सीच्या जाण्याची तयारी करत होते. डोर्सी हे स्क्वेअर या आर्थिक पेमेंट कंपनीचे सर्वोच्च अधिकारी देखील आहेत. विशेष म्हणजे शेअर बाजारात सध्या मंदावलेल्या स्थितीत असताना ट्विटरच्या शेअर्सने सोमवारी सकाळी उसळी घेतली.
ट्विटर हे सध्या सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्यावर राजकारणी आणि सेलिब्रिटींसारखे हाय-प्रोफाइल वापरकर्ते असले तरी ते पत्रकारांमध्येही लोकप्रिय आहे. मात्र ट्विटर हे फेसबुक आणि यूट्यूब सारख्या जुन्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आणि वापरकर्त्यांच्या बाबतीत टिकटॉक सारख्या नवीन प्लॅटफॉर्मपेक्षा खूप मागे आहे, तरीही ट्विटर वर दररोज २०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. मात्र काही वेळा ट्विटर हे वादग्रस्त देखील ठरले होते.